लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य परिवहन महामंडळातील(एसटी) कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२०पासून मूळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी घेतला. यानिर्णयाचे एसटी कर्मचारी कृती संघटनेने स्वागत करीत संप मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यामुळे गणपतीसाठी गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र सणासुदीला लोकांना वेठीस धरल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याबरोबरच मागील वेतन वाढीतील फरक दूर करावा आदी प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने मंगळवारपासून संप पुकारला होता. त्यामुळे गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांची मोठी कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्याोगमंत्री उदय सामंत, आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, कामगार नेते हनुमंत ताठे आदी उपस्थित होते. सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असताना उत्सवाच्या काळात संप करून सामान्यांना वेठीस धरणे योग्य नाही, असे सांगत बैठकीच्या सुरूवातीलाच शिंदे यांनी नाराजी बोलून दाखविली. संघटनांच्या मागणीवर मध्यममार्ग काढत एप्रिल २०२० पासून पूर्वलक्षी प्रभावाने मुळ वेतनात ६५०० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. त्याचबरोबर राज्यातील आगारांमध्ये चालक-वाहकांसाठी असणारी विश्रामगृहांची दुरवस्था दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. एसटीचा महसूल वाढीसाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही शिंदे यांनी केले. कर्मचाऱ्यांना सरसकट ६५०० रुपयांची वाढ देण्यात आल्याचे कर्मचारी संघटनेचे नेते श्रीरंग बरगे यांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांना वैद्याकीय खर्च प्रतिपूर्ती बाबतविषयी चर्चा करताना राज्य शासनाने सर्वांसाठी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना केली असून त्याच्याशी संलग्न योजना एसटी महामंडळाने करावी, त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना होईल, अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभराचा मोफत पास, निलंबित कर्मचाऱ्यांना सेवेत घेणे आदी विषयांबाबत चर्चा करण्यात आली असून हे विषय मार्गी लागतील, असे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी बैठकीनंतर सांगितले.

हेही वाचा >>>अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची अद्याप नियुक्ती का नाही ? भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

बरगेसदावर्तेंमध्ये वाद

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत एस. टी. कर्मचाऱ्यांचे नेते श्रीरंग बरगे आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यात वादावादी झाली. बरगे सदावर्तेे यांच्या अंगावर धावून गेले असता उपस्थितांनी मध्यस्थी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

२०१६ ते २०२० वर्षाच्या कालावधीतील २,१५८ कोटींची थकबाकी देण्यात येणार आहे. एप्रिल २०२० पासून मूळ वेतनात ६,५०० रुपयांची वेतन वाढ केली. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहावर ५०० कोटी रुपयांची तरतूद केली जाईल. आंदोलनाच्या यशाचे कोणीही श्रेय लाटण्याचे काम करू नये.- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना