मुंबई : सागरी किनारा मार्गाचे काम वेगात सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मध्यरात्री या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मरिन ड्राइव्हपासून उत्तरेला जाणाऱ्या मार्गावरील आंतरमार्गिका, रस्ते, सागरी पदपथ आदी प्रगतिपथावरील कामांचा आढावा घेतला. सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे – वरळी सागरीसेतू यांना जोडणाऱ्या मार्गाची एक वाहिनी जुलै अखेरीस सुरू करावी आणि त्यावर दोन्ही बाजूने वाहतूक सुरू करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पालिका प्रशासनाला दिले. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाच्या कामांची पाहणी करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: रोडरोलर चालवून प्रकल्पाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांचे मनोबल वाढविले.
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाचे काम वेगात सुरू असून सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पावर विविध यंत्रसामुग्रीसह मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा दिवसरात्र काम करीत आहे. या आठवड्यात प्रकल्पाचा दुसरा बोगदाही सुरू झाला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतून हाजीअलीकडे जाणारी वाहतूकही सुरू झाली आहे. मात्र सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे वरळी सी लिंकला जोडणारा पूल अद्याप सुरू न झाल्यामुळे प्रकल्प पूर्णत: वापरण्यास अद्याप प्रतीक्षा करावी लागत आहे. मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प वांद्रे – वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी दोन तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) टाकून दोन वाहिन्या तयार करण्यात येत आहेत. त्यापैकी एक वाहिनी जुलै २०२४ अखेर पूर्ण करून त्यावरून दक्षिण मुंबईकडे येणारी, तसेच उत्तरेकडे जाणारी वाहतूक खुली करण्याचे नियोजन करा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली. त्यामुळे जुलै महिन्यानंतर दक्षिण मुंबईतून सागरी किनारा मार्गावरून पश्चिम उपनगरातून ये जा करता येणार आहे.
या पाहणीच्या वेळी एकनाथ शिंदे यांच्यासह महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) गिरीश निकम आदींसह मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, हा संपूर्ण प्रकल्प लवकरच मुंबईकरांसाठी खुला करण्यात येईल. यासह मुंबईतील सिमेंट काँक्रिटचे रस्ते, मुंबईचे सौंदर्यीकरण, सखोल स्वच्छता अभियान, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आदी उपक्रमांतून मुंबई महानगराच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि वांद्रे – वरळी सागरी सेतू समुद्रात एकमेकांना जेथे सांधले जातात तेथील दोन खांब्यांमधील अंतर ६० मीटरवरून १२० मीटरपर्यंत नेण्यात आले. कोळी बांधवांची गैरसोय टळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भविष्यात मासेमारी करताना कोळी बांधवांना कोणतीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
हेही वाचा >>>माथाडी युनियनचा पदाधिकारी असल्याचे भासवून खंडणीची मागणी; एकाला अटक
मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. वेळेची सुमारे ७० टक्के बचत, तर इंधनात ३४ टक्के बचत होणार आहे. तसेच ध्वनिप्रदूषण व वायू प्रदूषणातही घट होण्यास मदत होणार आहे. यासह पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पावसाळ्यात मुंबईकरांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी विविध पातळीवर महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.