मुंबई : गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने युतीत लढवलेल्या २२ जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दावा केला आहे. शिंदे गटाबरोबर असलेल्या १३ खासदारांसाठी मतदारसंघ सोडण्याची भाजपची योजना आहे. मात्र शिंदे गटाने २२ जागांवर दावा केल्याने महायुतीतील जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरू शकतो.
लोकसभेसाठी गेल्या वेळी शिवसेनेच्या वाटय़ाला आलेल्या सर्व २२ जागा लढविण्याची तयारी शिंदे गटाने सुरू केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी निवडणूक रणनीती, प्रचार आणि या मतदारसंघातील प्रलंबित असलेले प्रश्न आदी मुद्दय़ांबाबत आपल्या गटातील खासदारांशी सोमवारी चर्चा केली. ‘‘युतीत गेल्या वेळी शिवसेनेच्या वाटय़ाला २२ जागा आल्या होत्या. तेवढय़ा जागा सोडाव्यात, अशी आमची भूमिका आहे,’’ असे खासदार गजानन कीर्तीकर यांनी सांगितले. आपण वायव्य मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचेही कीर्तीकर यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>>दुग्धविकास विभागाचा कारभार लवकरच गुंडाळणार; ‘पशुसंवर्धन’मध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव
शिंदे गटाने २२ जागांवर दावा केला असला तरी शिवसेनेचे १८ पैकी १३ खासदार शिंदे गटाबरोबर आहेत. तेवढय़ाच १३ जागा शिंदे गटाला सोडण्याची भाजपची योजना आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा गट बरोबर असल्याने त्यांच्यासाठीही भाजपला जागा सोडाव्या लागणार आहेत. त्यामुळे शिंदे गटाची अतिरिक्त जागांची मागणी भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते.
हेही वाचा >>>याला म्हणतात कामगिरी! मुंबईतल्या टीसीने सहा महिन्यात वसुल केला १ कोटींपेक्षा जास्त दंड, मध्य रेल्वेकडून कौतुक
अजित पवार गटाला किती जागा?
शिंदे गट २२ जागांवर अडून राहिल्यास भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला किती जागा मिळतील, असा प्रश्न आहे. भाजपचे सध्या २३ खासदार आहेत तर अजित पवार गटाबरोबर राष्ट्रवादीच्या चारपैकी सुनील तटकरे हे एकमेव खासदार आहेत. अजित पवार गटाला सहा ते सात जागा हव्या असल्याचे सांगितले जाते.
आम्ही २२ जागांवर संघटनात्मक बांधणी
आणि प्रचाराच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याच्या जागांबाबत शिंदे आणि भाजपचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. – गजानन कीर्तीकर, खासदार, शिंदे गट