मुंबई : महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत फॉर्म भरून देणे, दाखले देण्यासाठी महिलांची अडवणूक करून पैशांची मागणी केली जात आहे.सत्ताधारी पक्षाचे नेते, कार्यकर्ते स्वत:चा फोटो छापलेले अर्ज वाटत आहेत. एकूणच राज्यभर महिलांची फसवणूक सुरू असल्याचा आरोप बुधवारी सर्वपक्षीय नेत्यांनी विधानसभेत केला. यावर योजनेच्या अंमलबजावणीत कोणी अधिकारी महिलांची अडवणूक करीत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बुलढाणा जिल्ह्यातील एका तलाठ्याला निलंबित करण्यात आले आहे. विधानसभेत सुनील शेळके यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत विविध ठिकाणी महिलांची अडवणूक होत असून त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जात असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणली. बुलढाणा जिल्हयात अशाच प्रकारे एका तलाठ्याने महिलांकडे पैसे मगितल्यांतर त्याला निलंबित करण्यात आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारकडून शिबिरांचे आयोजनही केले जाईल अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.

हेही वाचा >>>महालक्ष्मी रेसकोर्सवर अखेर पब्लिक पार्क; १२० एकर भूखंड आता महानगरपालिकेच्या ताब्यात, भाडेपट्टा करारावर स्वाक्षरी

कारवाई करणार

योजनेच्या अंमलबाजवणीदरम्यान पैशांसाठी महिलांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. योजनेच्या लाभासाठी पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सक्त सूचना शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.