मुंबई : मिठापासून ते वाहने, विमानांपर्यंत अनेक वस्तूंची टाटा समूहाच्या उद्योगातून निर्मिती होते. टाटा समूहाने देशासह जगभरातील उद्योग क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. टाटा म्हणजेच ट्रस्ट वा विश्वास अशी जगभर ख्याती असलेल्या उद्योग समूहाचे रतन टाटा यांना पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार प्रदान केल्याने या पुरस्काराची उंची वाढली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी टाटा यांचा गौरव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याच्या उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देत महाराष्ट्राचे नाव जगभरात पोहोचविणाऱ्या नामवंत उद्योजकांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या धर्तीवर या वर्षीपासून ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यात ‘उद्योगरत्न’ पुरस्कारासाठी रतन टाटा यांची निवड करण्यात आली. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम रविवारी होणार आहे; पण प्रकृतीच्या कारणास्तव समारंभाला उपस्थित राहणे शक्य होणार नसल्याचे पत्र टाटा यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले होते. यामुळेच राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत आदींनी टाटा यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी जाऊन रतन टाटा यांना पहिल्या उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित केले. २५ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

या वेळी शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, ‘टाटा सन्स’चे प्रमुख तथा महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा आदी उपस्थित होते.

राज्य सरकारच्या या पुरस्काराचा आपण विनम्रपणे स्वीकार करीत असल्याचे सांगत टाटा यांनी सरकारच्या उपक्रमाचेही कौतुक केले. मुख्यमंत्र्यांसह उपस्थित मान्यवरांनी पुरस्कार वितरणानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी रतन टाटा यांच्या कार्याचा गौरव केला.

उद्योग पुरस्कारांचे आज वितरण

राज्य सरकारने सुरू केलेल्या महाराष्ट्र उद्योग पुरस्कारांचे वितरण रविवारी वांद्रे- कुर्ला संकुलातील ‘जियो वल्र्ड कन्व्हेन्शन’ सेंटरमध्ये होणार आहे. या वेळी उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘सिरम इन्स्टिटय़ूट’चे आदर पुनावाला यांना उद्योगमित्र, किर्लोस्कर उद्योग समूहाच्या संचालिका गौरी किर्लोस्कर यांना महिला उद्योजक, तर नाशिकच्या ‘फार्मर प्रोडय़ूसर’ कंपनीचे विलास शिंदे यांना मराठी उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister eknath shinde said that tata means trust and is famous all over the world mumbai amy
Show comments