मुंबई : महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा ते आरोप करीत आहेत मात्र महाराष्ट्रापासून मुंबई चंद्र सूर्य असे पर्यंत कोणाच्या बापाला तोडू देणार नाही, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपांना आझाद मैदानावरील मेळाव्यात उत्तर दिले. आपण मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवत आहोत. मुंबई पालिकेच्या कामात तुम्ही काळय़ाचे पांढरे करीत होतात. पैसे खाण्यासाठी मुंबईतील रस्त्यट्च्या कामाची दुरुस्ती केली जात होती मात्र आम्ही मुंबईतील सर्व रस्ते हे सिमेंट क्रॉक्रिट करण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.
पैसे खाण्याचे त्यांचे मार्ग बंद झाले आहेत. तुम्ही मृतदेहाच्या पिशव्या, खिचडी, कोविड सेंटर, ऑक्सीजन सेंटर यांच्या कामात पैसे खाल्ले ३०० ग्रॅम खिचडीच्या ऐवजी १०० ग्रॅम खिचडी रुग्णांना दिली गेली. हे सर्व पापे कुठे फेडणार, असा सवाल शिंदे यांनी केला. गेल्या वर्षी शिवाजी पार्क येथे आम्ही दसरा मेळावा करु शकलो असतो पण राज्यातील शांतता कायम राहावी यासाठी आम्ही माघार घेत आहोत. बाळासाहेबांचा विचार असणारे प्रत्येक मैदान आमच्यासाठी शिवतीर्थ आहे असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>> Eknath Shinde Dasara Melava 2023 : “इंडिया आघाडीच्या दहा तोंडी रावणाचं…”, एकनाथ शिंदेंची टीका
मुख्यमंत्री शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळत बोचरी टीका केली. त्याचवेळी राज्य सरकारचे प्रकल्प व शासन निर्णयांची माहिती दिली. त्या शिवसेनेतून आझाद झालेल्या शिवसैनिकांचा आझाद मैदानावर हा मेळावा होत आहे. आम्ही हिंदूत्वासाठी बाहेर पडलो आणि ठाकरे यांनी सत्तेसाठी काँग्रेसची लाचारी पत्करली. ‘गर्व से कहो हिंदू है’ ही घोषणा ज्या शिवाजी पार्कवरुन बाळासाहेबांनी दिली. त्यांचा मुलगा हिंदूत्व विरोधी भूमिका घेत आहे. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसवर टीका केली त्या काँग्रेसचे जोडे उचलण्याचे काम त्यांचे चिरंजीव करीत आहेत. आम्हाला ‘ एक फूल एक हाफ’ म्हणून डिवचता. पण हेच ठाकरे आपला पक्ष काँग्रेसमध्ये कधी विलीन करतील ते कळणार नाही. बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती देणारे हे ठाकरे रथयात्रा अडवणाऱ्या समाजवाद्यांबरोबर आहेत. हे सत्तेसाठी कोणाबरोबरही युती करु शकतात. त्यांना एमआयएम अथवा इस्त्रायल वर हल्ला करणारी हमास, लष्कर ए तोयबा सारख्या दहशतवादी संस्थाचाही अपवाद नाही. उध्दव ठाकरे यांना केवळ कुटुंब महत्वाचे असून शिवसैनिक दुय्यम आहेत. कोणाबरोबरही युती करणारे हे महागद्दार आहेत, असा आरोपही शिंदे यांनी केला. .
निवडणूक आयोगाने आम्हाला नाव आणि चिन्ह दिल्यानंतर पक्षाच्या खात्यात जमा असलेले ५० कोटी रुपयांसाठी तगादा लावला होता. त्यांना पैसा महत्वाचा असल्याने आम्ही ते ५० कोटी रुपये देऊन टाकले. ५० खोक्यांचे आरोप करता आणि आमच्याकडूनच ५० कोटी मागतात. ठाकरे यांना खोके पुरत नाहीत तर त्यांना कंटेनर लागतो याचा साक्षीदार मी असल्याचा अनुभवही शिंदे यांनी सांगितला.
सुविधांची रेलचेल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या मेळाव्याला विचारांचे सोने लुटायला आलेल्या शिवसैनिकांसाठी सुविधांची मोठी रेलचेल होती.
मागच्या वर्षी वांद्रे येथील ‘एमएमआरडीए’ मैदानावर दसरा मेळावा पार पडला होता. त्या तुलनेत यंदा आझाद मैदान हे कमी आकारमानाचे मैदान निवडले होते. त्यातील दोन्ही बाजुंनी पडदे लावून खुर्च्या ठेवल्या होत्या. आझाम मैदानाचा परिसर नेत्यांच्या शुभेच्छा फलकांनी भरुन गेला होता.