मुंबई : राज्य सरकारला ‘शक्तीपीठ महामार्ग’ पूर्ण करावयाचा आहे. पण, हा महामार्ग शेतकऱ्यांवर लादायचा नाही. ज्या शेतकऱ्यांचा विरोध आहे, त्यांच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन अडचणी सोडविल्या जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न उपस्थित केला. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ होणार नाही, अशी घोषणा कोल्हापूरमध्ये केली होती. तरीही पुन्हा शक्तीपीठ महामार्गाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शासनाला शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे. पण, तो शेतकऱ्यांवर लादायचा नाही. मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मी कोल्हापूर विमानतळावर गेलो असता सुमारे एक हजार शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग व्हावा, अशी मागणी करणारे निवेदन मला दिले होते. त्यातील एकही शेतकरी खोटा नाही, खोटा असल्यास कारवाई करावी, असेही शेतकऱ्यांनी म्हटले होते.
शेतकऱ्यांनी शक्तीपीठाला जागा देण्यास सहमती दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी सहमतीचे निवेदन मला दिलेले आहे. शक्तीपीठ केवळ श्रद्धेचा विषय नाही. मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांसह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांच्या विकासासाठी शक्तीपीठ महामार्ग पूर्ण केला जाणार आहे. महामार्ग ज्या जिल्ह्यांतून जाणार आहे, त्या जिल्ह्यांचा वेगाने विकास होणार आहे. कोल्हापूरमधून पाऊण तासात मोपा (उत्तर गोवा) विमानतळावर जाता येणार आहे. जमिनीच्या चार-पाच पट भाव मिळतो, त्यामुळे शेतकरी जमिनी देण्यास तयार होत आहेत.
रस्ते विकासाचे मार्ग आहेत. समृद्धी, शक्तीपीठ आणि कोकण महामार्गामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला विमानतळ, बंदरांशी जोडले जाणार आहे. दळणवळणाच्या सोयी वाढणार आहेत. शक्तीपीठ महामार्ग आमचा अट्टहास नाही. आझाद मैदानावर आज शक्तीपीठाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाला उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांच्या तीन पट शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शक्तीपीठाला समर्थन असणाऱ्या शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला जाणार आहे. माजी मंत्री, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी मध्यस्थी करावी, शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून घेऊन त्यावर मार्ग काढू. शेतकऱ्यांच्या सहमतीने महामार्ग पूर्ण करू, असेही फडणवीस म्हणाले.आझाद मैदानावर बाधित शेतकऱ्यांचा मोर्चा
सरकारला महामार्गासाठी एक इंचही मोजणी करू देणार नाही. जबरदस्तीने मोजणी केल्यास पळवून लावू, असा इशारा शक्तीपीठ विरोधी नेत्यांनी दिला. राज्यातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही. काहीही झाले तरी शेवटपर्यंत एकजुटीने लढू असा, निर्धार १२ जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांनी आझाद मैदानावर केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जयंत पाटील, आमदार कैलास पाटील, प्रवीण स्वामी, सचिन अहिर आदींनी मोर्चाला उपस्थित राहून समर्थन दिले. शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे, राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.