शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील अंत्यसंस्काराच्या वेळी पाळण्यात आलेल्या बंदबद्दल ‘फेसबूक’वर नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी दोन मुलींना अटक केल्याच्या घटनेचे केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवर तीव्र पडसाद उमटले आहेत. पालघर पोलिसांच्या या कृतीबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कमालीचे संतप्त झाले असून या चौकशीचा अहवाल बुधवारी प्राप्त झाल्यावर संबंधित पोलिसांवर कारवाई केली जाईल, असे समजते.
कोकण परिक्षेत्राच्या महानिरीक्षकांना पालघर घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हा अहवाल बुधवापर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. अहवाल आल्यावरच पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले. अहवाल प्राप्त झाल्याशिवाय कोणतीही कारवाई होणार नाही. पालघर पोलिसांनी कोणाच्या सल्ल्याने ही कारवाई केली, सल्ला कोणी दिला, ज्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला त्या गुन्ह्य़ात लगेचच अटक करण्याची आवश्यकता होती का, या साऱ्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले.
पालघर पोलिसांनी वरिष्ठांचा सल्ला घेऊन दोन मुलींना अटक केल्याची प्राथमिक माहिती मंत्रालयात उपलब्ध झाली आहे. हा सल्ला कोणी दिला याची सविस्तर चौकशी करण्यात येत आहे. गुन्हा दाखल करणारे पोलीस निरीक्षक वा सल्ला देणारे उपअधीक्षक यांच्या विरोधात निलंबन अथवा बदलीची कारवाई होऊ शकते. पालघर पोलिसांच्या या कृतीबद्दल प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती काटजू यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात निलंबन, अटक व आरोपपत्र सादर करण्याची त्वरित कारवाई करावी, अशी सूचना राज्य सरकारला केली आहे.
गेल्याच वर्षी डोिबवलीत खड्डे चुकविताना दुचाकी घसरून एका महिलेचा मृत्यू झाला. त्याबद्दल पोलिसांनी दुचाकी चालविणाऱ्या त्या महिलेच्या मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याबद्दल बरीच ओरड झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी दखल घेताच पोलिसांनी गुन्हा मागे घेतला होता. असिम त्रिवेदीप्रकरणीही पोलिसांची घाई नडली होती.
पालघर पोलिसांच्या ‘कर्तव्यदक्षते’मुळे मुख्यमंत्री संतप्त; कारवाईची शक्यता
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील अंत्यसंस्काराच्या वेळी पाळण्यात आलेल्या बंदबद्दल ‘फेसबूक’वर नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी दोन मुलींना अटक केल्याच्या घटनेचे केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवर तीव्र पडसाद उमटले आहेत. पालघर पोलिसांच्या या कृतीबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कमालीचे संतप्त झाले असून या चौकशीचा अहवाल बुधवारी प्राप्त झाल्यावर संबंधित पोलिसांवर कारवाई केली जाईल, असे समजते
First published on: 21-11-2012 at 05:51 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister irritate on palghar police