काँग्रेसचे राष्ट्रवादीला प्रत्युत्तर!
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे लवकर निर्णय घेत नाहीत म्हणून राष्ट्रवादीने टीका सुरू केली असतानाच, विचारपूर्वक निर्णय घेत असल्यानेच विलंब लागतो, असे प्रत्युत्तर काँग्रेसच्या वतीने आज देण्यात आले. सरकारमध्ये एकत्र असताना मुख्यमंत्र्यांवर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षाने पातळी सोडून बोलणे कितपत योग्य आहे का, असा सवालही काँग्रेसने केला.
काँग्रेस-राष्ट्रवादीत आरोप सुरू होण्यास गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे विधान कारणीभूत ठरले. पाटील यांनी गुन्हेगारीवरून डिवचल्यानेच काँग्रेसने त्याला प्रत्युत्तर दिले. एकीकडे काँग्रेसला वडिल बंधू म्हणायचे आणि दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप करायचे हे योग्य आहे का, असा सवालही काँग्रेसने केला. कोणत्याही पक्षाने मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा बाळगण्यात काहीच वावगे नाही. पण मुख्यमंत्री कामच करीत नाहीत वा निर्णय घेण्यास विलंब लावतात ही टीका करणाऱ्यांनी मुख्यमंत्री विचारपूर्वक निर्णय घेतात म्हणूनच वाद निर्माण होत नाही हे लक्षात ठेवावे, असा टोलाही काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राष्ट्रवादीला हाणला.
काँग्रेसवर आरोप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भाजपबरोबर सालेलोटे असल्याचा आरोपही करण्यात आला. नागपूर, चंद्रपूर, अमरावती या विदर्भातील जिल्हा परिषदांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र सत्तेत आहेत याकडे सावंत यांनी लक्ष वेधले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पिचड यांनी मुख्यमंत्र्यांची संभावना ‘पुळचट’ अशा शब्दांत केल्याबद्दलही काँग्रेसने आक्षेप घेतला. राष्ट्रवादीचे काही आक्षेप असल्यास त्यांनी समन्वय समितीच्या बैठकीत ते मांडावेत, असेही काँग्रेसने सुचविले. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीत आरोपांची राळ उठली असली तरी पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत आघाडी कायम राहील, असा विश्वासही या प्रवक्तयाने व्यक्त केला.

Story img Loader