दुष्काळग्रस्तांचे स्थलांतर थांबविण्यासाठी बीड जिल्हयात सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे उघडकीस आले आहे.मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत याची चर्चा होताच संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.
दुष्काळी भागात ‘मागेल त्याला काम’ देण्याची घोषणा राज्य सरकारने केली असून परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्याना देण्यात आले आहेत. बीड जिल्हयात मात्र रोहयोच्या कामात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून तेथील जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी हा घोटाळा उकरून काढण्यास सुरुवात केली होती. मात्र त्याच वेळी त्यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाडय़ातील काही मंत्र्यांनी बीडमधील रोहयोत होत असलेल्या भ्रष्टाचाराकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
या जिल्ह्यात अनेक ठिकाणी मजुरांचे हजेरी पत्रक, जॉबकार्ड नाही, खोटी कामे दाखवून निधी उकळला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. त्यानंतर या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
दरम्यान, प्रशिक्षणावरून परतलेल्या केंद्रेकर यांची जिल्हाधिकारी पदावरून बदली करण्याचा सरकारचा प्रयत्नही लोकांनी हाणून पाडला. जिल्हाधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ बुधवारी बीडमध्ये झालेल्या आंदोलनानंतर केंद्रेकर तेथेच राहतील, असा खुलासा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा