ठाण्यातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी मंत्रालयात आयोजित केलेली सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक काँॅग्रेस आणि राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांच्या दबावतंत्रामुळे रद्द करावी लागल्याने या प्रश्नावर रंगलेल्या श्रेयाच्या राजकारणाने टोक गाठल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पालकमंत्री गणेश नाईक यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेत काँॅग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्य़ातील शिवसेना आमदार तसेच इतर पदाधिकाऱ्यांनाही आमंत्रित केले होते. पालकमंत्र्यांच्या या ‘सर्वसहमती’च्या राजकारणाला विरोध करत ठाणे शहरातील काँॅग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘बैठकीसाठी आम्हाला आधी बोलवा, शिवसेना आमदारांचे लाड नंतर पुरवा‘, अशी टोकाची भूमीका घेत बहिष्काराची भाषा सुरु केली होती. या बैठकीवरुन विरोधाचे राजकारण तापते आहे हे लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी क्लस्टरप्रश्नी आयोजित केलेली बैठकच रद्द करत असल्याचा निर्णय घेतला. त्यामुळे क्लस्टर प्रश्नावर मध्यस्थाची भूमीका बजाविणारे पालकमंत्री नाईकांनाही ठाण्यातील आघाडीच्या नेत्यांनी तोंडघशी पाडल्याचे स्पष्ट झाले आहे.
क्लस्टरच्या मुद्दयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना उपोषण मागे घेण्यास भाग पाडत गणेश नाईक यांनी या प्रश्नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत विशेष बैठकीचे आयोजन करण्याचा शब्द स्थानिक नेत्यांना दिला होता. पालकमंत्र्यांच्या या भूमीकेस राष्ट्रवादीतील एका मोठय़ा गटाने विरोध दर्शविला होता. तरीही आपले राजकीय वजन वापरुन नाईकांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावली. ही बैठक बोलविताना त्यास ‘सर्वपक्षीय’ असे स्वरुप दिले गेले. गुरुवारी सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीचे निमंत्रण पालकमंत्र्यांनी स्वतच्या लेटरहेडवर जिल्ह्य़ातील सर्वपक्षीय खासदार, आमदार, महापौर तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांना पाठविले. ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमध्ये पुनर्विकासाच्या मुद्दयावरुन सर्वच पक्षांमध्ये श्रेयाची लढाई रंगली आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यास काँग्रेस, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना विरोध होता. ‘या बैठकीसाठी आम्हाला स्वतंत्र्य वेळ द्या. शिवसेना नेत्यांसोबत आम्हाला भेट नको’, अशी ताठर भूमीका दोन दिवसांपुर्वीच कॉग्रेसचे नेते रिवद्र फाटक तसेच राष्ट्रवादीचे हणमंत जगदाळे यांनी मांडली होती. पालकमंत्र्यांच्या सर्वसहमतीच्या राजकारणाला जीतेंद्र आव्हाड यांचाही विरोध होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे या बैठकीच्या पुर्वसंध्येला स्थानिक नेत्यांनी आपला विरोध उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यापर्यत पोहचवला. राणे यांनीही स्थानिक नेत्यांना साथ देत मुख्यमंत्र्यांपर्यंत ठाण्यातील काँग्रेस नेत्यांची ‘व्यथा’ पोहचवली. या बैठकीवरुन आघाडीत वाद निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी ती रद्द केली.

क्लस्टरची बैठक रद्द
बैठकीवरुन विरोधाचे राजकारण तापते आहे हे लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी क्लस्टरप्रश्नी बैठकच रद्द केली. त्यामुळे क्लस्टर प्रश्नावर मध्यस्थाची भूमिका बजाविणारे पालकमंत्री नाईकांनाही ठाण्यातील आघाडीच्या नेत्यांनी तोंडघशी पाडले