प्रस्थापित पांढरपेशे लेखक आणि रसिक यांना आपल्या अनोख्या शैलीने हादरा देणारे ज्येष्ठ दलित साहित्यिक आणि ‘दलितपँथर’चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या निधनाने साहित्याच्या व चळवळीच्या माध्यमातून दलितांना आत्मभान देणारा आक्रमक नेता हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
शोकसंदेशात चव्हाण यांनी म्हटले आहे की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर ढसाळांची नितांत श्रद्धा होती. यामुळे ते तरुण वयातच दलित चळवळीकडे आकर्षित झाले. जात्याच प्रतिभावंत असलेल्या ढसाळांनी गद्य, काव्य, वृत्तपत्रीय स्तंभलेखन अशा विविध माध्यमां मधून बाबासाहेबांचे क्रांतिकारक विचार अतिशय ज्वलंत भाषेत लोकांपर्यंत पोचविण्याचे काम केले. दलितांच्या व्यथा मांडण्यासाठी साहित्य हेच प्रभावी साधन आहे, हे अचूक ओळखलेल्या ढसाळ यांनी आपल्या साहित्यकृतींमधून दलितांच्या वेदनांना वाचा फोडली. गोलपीठा, तुही यत्ता कंची, खेळ, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले, या सत्तेत जीव रमत नाही, मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे या सारख्या त्यांच्या आगळ्या शैलीतील काव्य संग्रहांनी मराठी साहित्यात एकच खळबळ उडवली आणि ते दलित साहित्यातील बिनीचे शिलेदार बनले.
अमेरिकेतील ‘ब्लॅकपँथर’ चळवळीने प्रभावित होऊन त्यांनी १९७२मध्ये स्थापन केलेल्या ‘दलितपँथर’ संघटनेने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढले. दलित चळवळीला आक्रमक चेहरा देणाऱ्या या चळवळीने दलितांच्या अनेक प्रश्नांवर उग्र आंदोलने केली. सर्वसामान्यांसारखे साधेसुधे जीवन जगणारे ढसाळ अखेरपर्यंत ‘दलितपँथर’शी एकनिष्ठ राहिले. पद्मश्री, राज्य शासनाचे साहित्य पुरस्कार, साहित्य अकादमीचा जीवन गौरव पुरस्कार यांनी गौरवित झालेले ढसाळ यांच्या निधनाने केवळ दलितांचेच नव्हे तर सामाजिक न्यायाच्या चळवळीचेही नुकसान झाले आहे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ढसाळ यांची कविता म्हणजे वणवा!
नामदेव ढसाळ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाचे भाष्यकार होते. याचे प्रत्यंतर त्यांच्या वैचारिक लेखनातून दिसून येते. त्यांनी रंजनात्मक किंवा आत्ममग्न  अशी कविता कधीही लिहिली नाही. त्यांची कविता म्हणजे एक वणवा होता. त्यामुळे काही उच्चभ्रू मंडळी दुखावली गेली होती, हे मला माहिती आहे. परंतु दलित माणसाचे जीवन हे सातत्याने संघर्षांकडे जाणारे असल्याने त्यांच्या वेदना, दु:ख, शब्दातून मांडायचे म्हणजे काही प्रमाणात जहालपणा येणारच. कोंडलेले दु:ख हे फार आवेगाने बाहेर येते, हे ढसाळ यांच्या कवितेने मराठी अभ्यासकांना दाखवून दिले आहे.
ढसाळ यांच्या निधनाने दलित साहित्य आणि दलित सामाजिक चळवळीची अपरिमित हानी झाली आहे. नामदेव हा दलित चळवळ आणि दलित साहित्य यांचा प्रभावी प्रवक्ता होता. त्याची कविता विद्रोही होती पण तो विद्रोह केवळ नकारात्मक नव्हता तर तो सकारात्मक होता. त्यांनी मराठी भाषेला नवे शब्द, नवा आशय आणि नवी अभिव्यक्ती दिली. ढसाळ हे चळवळीत सहभागी झाले तेव्हा गदगदलेले झाड असावे, त्याप्रमाणे त्यांचा आवेश विचारातून व चळवळीतून व्यक्त होत राहिला. ते अत्यंत निर्भय आणि परखड व्यक्तिमत्त्व होते. अन्याय आणि अत्याचार त्यांना अमान्य होता. त्याचा आविष्कार त्यांच्या सर्व लेखनात आणि चळवळीत दिसून येतो. आमच्या ‘अस्मितादर्श’ परिवाराशी त्यांचे प्रारंभापासूनच नाते जडले होते. त्यांची पहिली कविता ‘अस्मितादर्श’मध्येच प्रसिद्ध झाली होती. सामाजिक बांधीलकीशी आयुष्यभर स्वत:ला वाहून घेणारा असा कवी आणि कार्यकर्ता पुन्हा होणे नाही.
– प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे (ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक)

‘गोलपिठा’ ही काव्यसंग्रह मैलाचा दगड
नामदेव ढसाळ यांच्या कवितेची चळवळ आणि प्रवाहाचे उगमस्थान हे ‘गोलपिठा’ हा काव्यसंग्रह आहे. हा काव्यसंग्रह म्हणजे कवितेतील मैलाचा दगड आहे. ते त्यानंतर सातत्याने कविता लिहित राहिले. कविता लिहिताना त्यांनी त्यामुळे कोणाला काय वाटेल याची कधीही पर्वा केली नाही. आपले विचार धाडसाने कवितेतून व्यक्त केले. त्यांचा ‘गोलपिठा’ हा काव्यसंग्रह मी एका बैठकीत तीन तासात वाचून काढला आणि त्यावर आपण काही तरी लिहिले पाहिजे, असे वाटून त्यावर समीक्षात्मक लेखही लिहिला. प्रस्थापितांच्या विरोधातील एक प्रकारची नकारात्मकता त्यांच्या कवितेत होती. ढसाळ यांच्यानंतर जे कवी झाले त्या सर्वाचा ‘आदर्श’ नामदेव ढसाळ हे होते.  
– डॉ. विजया राजाध्यक्ष ,    (ज्येष्ठ साहित्यिका आणि समीक्षिका)

मराठी कवितेवर जबरदस्त प्रभाव
साठोत्तरी कवितेतील ते एक महत्त्वाचे कवी होते. त्यांचे योगदान केवळ दलित साहित्यापुरते मर्यादित ठेवता येणार नाही. जागतिक कवितेच्या पातळीची कविता त्यांनी मराठीत लिहिली. त्यांच्या कवितेचा मराठी कवितेवर जबरदस्त प्रभाव आहे. कवितेप्रमाणेच त्यांचे गद्यलेखन ही चिंतनशील आणि महत्त्वाचे आहे.
– वसंत आबाजी डहाके     (माजी साहित्य संमेलनाध्यक्ष)

चांगला मित्र गमावला
आम्ही एक चांगला मित्र गमावला आहे. आम्ही मुंबईत आलो तेव्हा आम्हाला नामदेव आणि मल्लिकाचे मुंबईतील घर हक्काचे होते. आमचे कौटुंबिक नाते जिव्हाळ्याचे होते. ही मैत्री शेवटपर्यंत आम्ही दोन्ही बाजूंनी जपली होती. आधुनिक मराठी कवितेतील त्याच्याइतका मोठा कवी दुसरा कोणी नाही. त्याची कविता समर्थ, अनेक पदर आणि परिमाण असणारी होती.  
– प्रभा गणोरकर (समीक्षिका आणि कवयित्री)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister prithviraj chavans condolence message for namdeo dhasal