पर्यावरणाचे संतुलन राखूनच आपल्याला विकास करावा लागणार असून केवळ नियम/कायदे करून किंवा शासन स्तरावर प्रयत्न करून चालणार नाही. तर पर्यावरण जतन आणि संवर्धन ही आता लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी केले.
राज्य शासनाचा पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून तर राज्याचे पर्यावरण मंत्री संजय देवतळे, पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहिर, पर्यावरण विभागाच्या सचिव वल्सा नायर-सिंह, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राजीवकुमार मित्तल, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे, कामगार मंत्री हसन मुश्रीफ हे ही विशेष मान्यवर म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.  
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ‘लोकसत्ता’यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘ग्लोबल वॉर्मिग-व्याप्ती, आव्हान आणि मार्ग’ या पुस्तकाचे प्रकाशनही मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर हे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रकाशनानंतर कुबेर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या पुस्तकाची एक प्रत भेट म्हणून दिली.
वाढत्या विकासाबरोबरच हवा, पाणी, घनकचरा आदींच्या प्रदूषणाचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थिीत पाणी आणि अन्य वस्तूंच्या पुनर्वापरावर अधिक भर देण्याची आवश्यकता असून समाजातही तशी मानसिकता तयार करणे गरजेचे असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, पर्यावरण जतन आणि संवर्धनात प्रत्येक नागरिकानेही सहभागी व्हावे. भावी पिढीसाठी आपण पर्यावरण राखले नाही तर ते आपल्याला कधीच माफ करणार नाहीत.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, प्रदूषण करणाऱ्या, नियम व कायदे न पाळणाऱ्या उद्योग आणि कारखान्यांच्या विरोधात पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाई करावी. भौतिक सुविधा उपलब्ध करून देताना आणि विकासासाठी पर्यावरणाचा बळी देऊ नये. केवळ वर्षांतून एखादा दिवस ‘पर्यावरण दिन’ म्हणून साजरा न करता प्रत्येकाने वर्षांचे ३६५ दिवस पर्यावरण पूरक व्हावे आणि पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत.  पश्चिम घाट जतन आणि संवर्धनासाठी येत्या १ ते १५ जुलै या कालावधीत ‘शेकरू महोत्सव’ आणि अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवतळे यांनी दिली.
अहिर, वल्सा नायर-सिंह, राजीवकुमार मित्तल यांचीही भाषणे या वेळी झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुस्कुटे यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा