मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय कक्षाच्या माध्यमातून राज्यातील गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय आर्थिक मदत यशस्वीपणे पोहचवली जाते. त्याचबरोबर आता सीमा भागातील अधिकाधिक नागरिकांना या योजनेचा लाभ व्हावा आणि कक्षाच्या नवीन कार्यपद्धतीची माहिती मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या नव्या कार्यपद्धतीमुळे निधीचे वितरण अधिक प्रभावी व सुलभ होण्यास मदत होणार आहे.

राज्यातील गरजू नागरिकांसह सीमा भागातील नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांमध्ये मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कक्षाच्या माध्यमातून सीमावर्ती भागातील गावांना सातत्याने आर्थिक सहाय्य केले जाते. ही मदत अधिक सुलभरित्या कशी पोहोचवता येईल यासाठी कक्षाकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

सीमा भागातील गरजू रुग्णांना त्वरित मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय कक्षाच्या नवीन कार्यपद्धतीची माहिती सीमा भागातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरच विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या नव्या कार्यपद्धतीमुळे निधीचे वितरण अधिक प्रभावी व सुलभ होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.

सीमावर्ती भागातील अर्जांवर प्राधान्यांने कार्यवाही

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाशी संलग्न असलेल्या सीमावर्ती भागातील रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांना कक्षामार्फत मदत करण्यात येते. त्याचबरोबर येत्या काळात सीमावर्ती भागातून ज्या रुग्णालयांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाशी संलग्नित होण्यासाठी अर्ज केले आहेत, त्याबाबत प्राधान्याने कार्यवाही केली जाईल. सीमा भागातील रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी नवीन रुग्णालयांचे संलग्नीकरण करण्याचे काम हाती घेतल्याचे रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

पारदर्शक मदतीसाठी नवे निर्णय

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून अधिकाधिक गरजू रुग्णांना तातडीने आणि पारदर्शक पद्धतीने मदत मिळावी यासाठी नवे निर्णय घेण्यात आले आहेत. आजारांचे पुनर्विलोकन, आर्थिक सहाय्याची नव्याने निश्चिती आणि रुग्णालय संलग्नीकरणासाठी निकष ठरवण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबत शासनाने शासन निर्णय जारी करण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

मदत क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

सीमा भागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. कक्षाच्या पुढाकारामुळे सीमा भागातील नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांमध्ये दिलासा मिळेल, असा आशावाद रामेश्वर नाईक यांनी व्यक्त केला. राज्यातील तसेच सीमा भागातील रुग्णांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मदत क्रमांक ९३२११०३१०३ वर संपर्क साधावा, असे आवाहन रामेश्वर नाईक यांनी केले.

Story img Loader