पुरेशी यंत्रणा नसल्याने काँग्रेस आघाडी सरकारने चिक्की खरेदीस स्थगिती दिलेल्या संस्थेकडूनच पंकजा मुंडे यांच्या खात्याने निविदा न मागविताच चिक्की खरेदी केल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने शनिवारी करण्यात आला. एकूणच काँग्रेस-राष्ट्रवादी व भाजप या दोन्ही पक्षांनी खरेदीकरिता एकच ठेकेदार निवडल्याने या ठेकेदाराचे हात बरेच वपर्यंत पोहचले असावेत, असेच एकूण चित्र आहे.
पंकजा मुंडे यांच्या खात्याने सुमारे ८० कोटींची चिक्की सिंधुदूर्ग जिल्ह्य़ातील सूर्यकांता महिला औद्योगिक सहकारी संस्थेकडून खरेदी केली आहे. या संस्थेला आघाडी सरकारच्या काळात ३७ कोटी रुपयांच्या चिक्की खरेदीचे काम मिळाले होते. पण या संस्थेकडे एवढे काम करण्याची यंत्रणा नव्हती. तसेच अनेक तक्रारी आल्या होत्या. यामुळेच आदिवासी विकास खात्याच्या तत्कालीन मंत्र्याने या संस्थेकडून खरेदी करण्याचा निर्णय घेतला तरी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यावर सरकारने खरेदीस स्थगिती दिली होती, अशी माहिती माजी आदिवासी विकास खात्याचे राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच दर निश्चितीनुसार कोणतीही खरेदी करू नये, असा आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता याकडे लक्ष वेधण्यात आले.
चिक्की खरेदीबाबत २०१३ मध्ये विधान परिषदेत नितीन गडकरी, विनोद तावडे, आशिष शेलार या भाजपच्याच सदस्यांनी प्रश्न विचारला होता. आदिवासी आयुक्तांनी ही चिक्की खरेदी करण्यास प्रतिकूलता दर्शविल्यावरही ही खरेदी कशी काय करण्यात आली, अशी माहिती विचारण्यात आली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा