खाण्याच्या वाईट सवयी आणि व्यायामाचा अभाव यामुळे भारतात १२ ते २५ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढते तर आहेच; पण या लहान रुग्णांमध्ये मधुमेहाची तीव्रताही खूप जास्त असल्याची माहिती पुढे येत आहे.
या आजाराची लागण होण्याचे प्रमाण मुलांमध्ये वाढते आहे. मधुमेहाचे हे लहान रुग्ण आतापर्यंत आजाराच्या पहिल्या टप्प्यावर असत. पण, लहान मुलांमध्ये मधुमेहाच्या तीव्रतेचा दुसऱ्या टप्पा गाठण्याचे प्रमाण आता जवळपास ५०टक्क्य़ांच्या आसपास आहे.
हे प्रमाण निश्चितच चिंताजनक असून हा प्रसार थांबविला नाही तर भविष्यातील तरूण पिढी मोठय़ा प्रमाणावर मधुमेहाची लागण झालेली असेल,’ असा इशारा प्रसिद्ध एंडोक्रिनोलॉजीस्ट डॉ. शशांक जोशी यांनी दिला. माहीम येथील एस. एल. रहेजा रुग्णालयात ‘जागतिक मधुमेह दिना’निमित्त आयोजिण्यात आलेल्या जागरूकता कार्यक्रमाच्या निमित्ताने तज्ज्ञांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ‘इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशन’चे अध्यक्ष प्रा. जॉन क्लाऊड मोबानिया यांनी जगातील व भारतातील मधुमेहाचे प्रमाण रोखण्यासाठी काय करता येईल, याची माहिती दिली.
चीनखालोखाल भारतात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मधुमेहाशी संबंधित कारणांमुळे दर १० सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यू होत असतो. मलेरिया आणि एड्सपेक्षाही मधुमेहाने मरण्याचे प्रमाण जास्त आहे.
जंक फूड, सीलबंद अन्न, तळलेले, मीठयुक्त अन्नपदार्थ, व्यायामाचा अभाव, तंबाखूजन्य पदार्थ, मद्य यांचे अतिसेवन यामुळे मधुमेहाची लागण होण्याचे प्रमाण वाढते आहे. आज २३ कोटी असलेली मधुमेहींची संख्या २०२५ मध्ये ३८ कोटींवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे, ‘जागतिक आरोग्य संघटने’ने मधुमेहाशी कसे लढता येईल, याचा कार्यक्रम आखला आहे. या कार्यक्रमाचा प्रमुख भरही लहान मुलांमधील मधुमेहाचे प्रमाण रोखण्यावर असेल, अशी माहिती प्रा. मोबानिया यांनी दिली. आजची तरूण पिढी भलेही हुशार असली तरी शाळा आणि क्लासेस यात इतकी पिचली आहे की त्यांच्या शरीराला आवश्यक तो व्यायामच मैदानी खेळांअभावी मिळत नाही. यामुळे त्यांच्या शरीरात अपायकारक चरबीचे प्रमाण वाढून त्याची परिणती मधुमेहासारख्या आजारात होते आहे,’ अशी माहिती डॉ. जोशी यांनी दिली.
वैश्विक स्वयंपाकगृह
‘आपल्या खाण्याच्या सवयी बिघडविण्यात काही दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीही कारणीभूत ठरतात. खरेतर भारतातील वैविध्यपूर्ण पारंपरिक आहारसंस्कृती आपल्या शरीराला आवश्यक ती पोषणमूल्ये पुरविण्यास सक्षम आहे. म्हणून जेव्हा आपण ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणतो तेव्हा या वैश्विक कुटुंबाचे स्वयंपाकगृह भारत म्हणायला हवे,’ अशी प्रतिक्रिया आहारातून मधुमेहावर कशी मात करता येईल, या विषयी सांगताना ‘डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया’चे डॉ. अनिल भोरसकर यांनी दिली.
गरीबांचा मधुमेह
अतिखाण्यामुळे जसा मधुमेह होतो तसा तो कुपोषणामुळेही होतो. केरळ आणि ओरिसा या भागात या प्रकारचा मधुमेहाच प्रकार आढळून आला आहे. विशिष्ट जीवनसत्त्वे पोटात न गेल्याने या प्रकारचा मधुमेह होत असल्याचे जोशी यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा