लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: भांडुप परिसरातील एका घरामधील स्लॅब मंगळवारी मध्यरात्री अंगावर कोसळल्यामुळे पाच वर्षांच्या एका मुलाचा मृत्यू झाला. याबाबत भांडुप पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
भांडुपमधील क्रॉसरोड परिसरातील झकारिया इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील एका घरात मध्यरात्री १२ च्या सुमारास ही घटना घडली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर तासीब शेख (५) आई – वडिलांसोबत राहत होता. रात्री तासीब घरात झोपला होता. त्यावेळी अचानक छताचा स्लॅब त्याच्या अंगावर कोसळला. त्यात तासीब गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.