मुंबई : वारंवार दुखत असलेले डोके आणि अचानक अंधूक झालेली नजर यामुळे नऊ वर्षांच्या रियांश यादवच्या पालकांच्या पायाखालची जमीन सरकली होती. मात्र सुरतमध्ये वास्तव्यास असलेल्या रियांशला त्याच्या पालकांनी तातडीने नायर रुग्णालयात दाखल केले. नायर रुग्णालयातील मज्जातंतू शास्त्र विभागातील डॉक्टरांनी तब्बल सहा तास यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याच्या मेंदूखाली असलेली गाठ काढून त्याला जीवदान दिले.
उत्तर प्रदेशमधील आजमगड जिल्ह्यातील नोनीपूर गावातील रहिवासी असलेले विक्रम यादव कामानिमित्त मागील काही वर्षांपासून सुरतमध्ये वास्तव्यास आहेत. परंतु मागील सहा महिन्यांपासून त्यांचा मोठा मुलगा रियांश यादवचे वारंवार डोके दुखून चक्कर येत होती. अभ्यासाला बसल्यानंतर रियांशला अधिक त्रास होत होता. त्यामुळे सुरूवातील रियांश अभ्यासासाठी टाळाटाळ करीत असल्याचे त्याच्या पालकांना वाटत होते. मात्र तो सतत डोके दुखत असल्याचे सांगत असल्याने वडील त्याला सुरतमधील डॉक्टरकडे घेऊन गेले. त्यांनी दिलेल्या औषधाने त्याचे डोके काही वेळ दुखायचे थांबत होते. काही दिवसांपूर्वी रियांश व त्याची आई मिरारोड येथील त्याच्या काकांकडे आले होते. त्यावेळी काका त्याला खासगी डॉक्टरांकडे घेऊन गेले. रियांशचे डोके दुखत असल्याने त्यांनी त्याला डोळ्यांच्या डाॅक्टरांकडे पाठवले. काही दिवसांनी रियांशची नजर अचानक कमी होऊन त्याला दुहेरी दिसू लागले. तसेच त्याचे डोळे लाल होऊन त्याची बुबुळे एका बाजूला झाली. त्यामुळे डॉक्टरांनी रियांशची एमआरआय करण्यास सांगितले. एमआरआयचा अहवाल आल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये गाठ असून शस्त्रक्रियेसाठी सात ते आठ लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले. हा खर्च रियांशचे वडील विक्रम यांच्या आवाक्याबाहेर असल्याने त्यांनी त्याला मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात आणले.
हेही वाचा – भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युईटीचा भरणा न केल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये रोष
नायर रुग्णालयातील मज्जातंतू शास्त्र विभागाच्या डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याच्या मेंदूच्या मागच्या पृष्ठभागामध्ये असलेल्या ग्रंथी (पिट्यूटरी ग्लँड) आणि मेंदूच्या मागील बाजूस असलेले दृष्टिच्या मज्जातंतूच्या जवळ पाच सेंमीची गाठ असल्याचे आढळून आले. तसेच या गाठीच्या बाजूला मेंदूतील अनेक महत्त्वाच्या रक्तवािहन्या असल्याने ही गाठ शस्त्रक्रिया करून काढताना रुग्णाच्या जीवावर बेतण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे रेडिएशन उपचार पद्धती हा एक पर्याय उपलब्ध होता. मात्र त्याने अन्य पेशी नष्ट होत असल्याने नायर रुग्णालयातील मज्जातंतू शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. आदिल छागला व त्यांच्या पथकाने आपले कौशल्य पणाला लावून तब्बल सहा तास शस्त्रक्रिया करून रियांशच्या मेंदूच्या खालील भागात असलेली पाच सेंमीटरची गाठ काढून त्याचे प्राण वाचविले. नायर रुग्णालयामध्ये ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.
हेही वाचा – दक्षिण मुंबई ते ठाणे सागरी किनारा मार्ग
लहान मुलांना रेडिएशन देणे त्रासदायक असते. गाठीचा काही अंश जरी शिल्लक राहिला तर ती पुन्हा वाढण्यची शक्यता असते. ते अधिक त्रासदायक असते. त्यामुळे रेडिएशन देण्याऐवजी शस्त्रक्रिया करण्यावर भर दिला. – प्रा. डॉ. आदिल छागला, मज्जातंतू शास्त्र विभाग प्रमुख, नायर रुग्णालय