मुंबई : दुसऱ्या पत्नीला आई म्हणण्यास नकार दिल्याने मुलाचा खून केल्याच्या आरोपाप्रकरणी सत्र न्यायालयाने एकाला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी. तावशीकर यांनी आरोपी सलीम शेख याला मुलाच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले. आरोपीनेच मुलाची हत्या केल्याचे आणि तोच या हत्येचा मुख्य सूत्रधार होता हे सिद्ध करण्यात पोलिसांना यश आल्याचेही न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावताना नमूद केले.
शेखच्या पहिल्या पत्नीनेच त्याच्याविरोधात मुलाच्या हत्येप्रकरणी तक्रार नोंदवली होती. तिने केलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने मुलगा इम्रान याला आपल्या दुसऱ्या पत्नीला आई म्हणून संबोधण्यास सांगितले. मात्र, इम्रान याने नकार दिल्यानंतर त्या दोघांमध्ये वाद झाला. त्यातूनच आरोपीने इम्रान याला मारहाण करण्यास सुरुवात केली. वाद टोकाला जात असल्याची जाणीव झाल्यानंतर तक्रारदार महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. परंतु, पोलिसांना घरी घेऊन येईपर्यंत आरोपीने मुलावर कात्रीने वार करून त्याला गंभीर जखमी केले होते. पोलिसांनी इम्रानला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, त्याला मृत घोषित करण्यात आले.
हेही वाचा – ६५ टक्के नवनिर्वाचित आमदारांवर गुन्हे
तथापि, घटनेच्या वेळी इम्रान हा अमली पदार्थाच्या अमलाखाली होता आणि त्याने स्वत:ला धारदार शस्त्राने जखमी करून आत्महत्या केली, असा बचाव आरोपीतर्फे करण्यात आला. न्यायालयाने मात्र त्याचा हा बचाव फेटाळला. तसेच, मुलाने आत्महत्या केली असती तर तक्रारदार पोलिसांकडे मदतीसाठी गेली नसती. तसेच, आरोपीने पळून न जाता जखमी मुलाला रुग्णालयात नेले असते, असे न्यायालयाने म्हटले. आरोपी आणि मुलामध्ये वाद झाल्याचे अन्य साक्षीदारांनीही सांगितल्याचे न्यायालयाने शेख याला त्याच्यावरील आरोपांत दोषी ठरवताना विचारात घेतले.
हेही वाचा – शिंदे यांची माघार? मुख्यमंत्रीपदाचा देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा
दरम्यान, हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असल्याचे सांगून सरकारी पक्षाने आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. तथापि, स्वतःच्या मुलाच्या हत्येला कारणीभूत ठरणे हे दुर्मिळ प्रकरण आहे असे म्हणणे योग्य असले तरी, हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ श्रेणीत येत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, सरकारी पक्षाची मागणी अमान्य करून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.