मुंबई : महानगरपालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंजुमन आय इस्लाम अल्लाना इंग्लिश हायस्कुल या शाळेच्या गच्चीवर गेल्या अनेक वर्षांपासून वर्ग भरविले जात आहेत. पाठीवर दपत्राचे ओझे वाहत दररोज सात मजले चढून विद्यार्थ्यांची दमछाक होऊ लागली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाने सप्टेंबरमध्ये शाळा प्रशासनाला प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अद्यापही शाळेने आयोगाकडे वैध कागदपत्रे सादर केलेली नाहीत. परिणामी, विद्यार्थ्यांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही.
सीएसएमटी येथे अंजुमन आय इस्लाम या संस्थेद्वारे गेल्या काही वर्षांपासून शाळेच्या गच्चीवर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे काही वर्ग भरविले जात आहेत. यासाठी गच्चीवर वर्गखोल्यांचे पक्के बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, हे बांधकाम अनधिकृत असून शाळेच्या गच्चीवर असे वर्ग भरविणे नियमात बसत नसल्याचा आरोप पालक जाहिद हुसेन यांनी केला आहे. सात मजले चढताना विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. याबाबत त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाचे नितीन दळवी यांना माहिती दिली. त्यानंतर दळवी यांनी याप्रकरणी मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाकडे केली होती. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी बालहक्क आयोगाने शिक्षण निरीक्षक दक्षिण आणि शाळेच्या मुख्याध्यापकांना कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेच्या इमारतीचे काही नकाशे पाठविल्यानांतर बालहक्क आयोगाने १३ सप्टेंबर २०२४ रोजी तक्रारदार, शाळा मुख्याध्यापिका, बालहक्क आयोगाचे सदस्य व आयोगाचे सचिव भालचंद्र चव्हाण, शिक्षण उपनिरीक्षक अनिल दहिफळे यांच्या उपस्थितीत सुनावणी घेतली. सुनावणीदरम्यान शाळेला गच्चीवर वर्गखोल्या बांधण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिलेल्या परवानगीची प्रत सादर करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच शिक्षण निरीक्षक दक्षिण यांनी महापालिकेने दिलेल्या परवानगीची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. जवळपास सहा महिने उलटत आले, तरीही बालहक्क आयोगाकडे अहवाल सादर करण्यात आलेला नाही.
महापालिका इमारतीच्या गच्चीवर बांधकाम करण्याची परवानगी देत नाही. तरीही शाळेने गच्चीवर अनधिकृतरित्या वर्गखोल्यांचे बांधकाम केले आहे. शाळेकडे गच्चीवर वर्ग बांधण्याची परवानगी नसल्यानेच शाळा परवानगीची प्रत देण्यास टाळाटाळ करीत आहे. विद्यार्थ्याना सात मजले जिने चढून जाण्यासाठी त्रास होतो. भविष्यात त्यांना कंबर आणि पाठीच्या व्याधी जडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हे सर्व वर्ग ताबडतोब बंद करून शाळा मुख्याध्यापिका व संस्थाचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी नितीन दळवी यांनी केली आहे. त्याचबरोबर शाळेच्या इमारतीला किती मजले असावेत, याबाबत नियम बनवावेत, अशीही मागणी त्यांनी केली.
दरम्यान, शाळेने केलेले बांधकाम अनधिकृत नाही. सर्व संबंधित विभागांच्या परवानगी घेऊन वर्गखोल्यांचे बांधकाम केलेले आहे. तसेच, शाळेने ३० मीटर उंचीही मर्यादा राखली असून याबाबत बालहक्क आयोगाकडे आवश्यक अहवाल सादर करण्यात आले आहेत, असा दावा शाळेचे विश्वस्त शगाफ नाकीद यांनी केला आहे.
बालहक्क आयोगाच्या आदेशानुसार कार्यवाही सुरू आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत बालहक्क आयोगाकडे प्रकरणाचा संपूर्ण अहवाल सादर करण्यात येईल.– देविदास महाजन, शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई दक्षिण विभाग