मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय (राणी बाग) येथे गणेशोत्सवातील सुट्ट्यांमध्ये बच्चेकंपनीसह पर्यटकांनी आवर्जून भेट दिली. संपूर्ण गणेशोत्सव काळात ८१ हजार ७५२ पर्यटकांनी राणीबागची सफर केली. मुंबईत आलेले पर्यटक राणीच्या बागेला आवर्जून भेट देतात. राणीच्या बागेत गेल्या काही महिन्यांपासून अनेक नवीन प्राणी आणण्यात आले आहेत. यासह राणीबागेत अनेक नाविन्यपूर्ण बदल केले आहेत. तसेच, पेंग्विन मुख्य आकर्षण असल्याने देशभरातून पर्यटक गर्दी करतात
राणी बागेत पर्यटकांची गर्दी वाढवण्यासाठी राणी बाग प्रशासनाकडून वेगवेगळे नवीन प्रयोग राबवण्यात येत आहेत. राणीबागेत सध्या पेंग्विन, वाघ, बिबट्या, बाराशिंगा, तरस, अस्वल, हत्ती, देशी-विदेशी पक्षी बघण्यासाठी येतात. रॉयल बंगाल वाघांची जोडी आणि पेंग्विन्स पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी होती.
उद्यान-प्राणिसंग्रहालयात एकूण १३ जातींचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी व ७ जातींचे ३२ सरपटणारे तसेच जलचर प्राणी असे एकूण २७३ प्राणी आणि पक्षी आहेत. विविध ३० प्रजातींचे सुमारे २५० पक्षी पर्यटकांना याठिकाणी पाहायला मिळतात. याशिवाय २८६ प्रजातींचे सुमारे साडेतीन हजार झाडे दुर्मिळ वृक्ष पाहण्यासाठी अनेक वृक्षप्रेमी राणीबागेत हजेरी लावतात. विशेषतः शनिवार व रविवारीही अधिक पर्यटक आले, अशी माहिती जीवशास्त्रज्ञ अभिषेक साटम यांनी दिली. ३१ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत सुमारे ८१ हजार ७५२ पर्यटक राणीबागेची सफर केली. गणेशोत्सव असतानाही गणपतीचे दर्शन घेऊन आपल्या पाल्याना राणीबागमधील प्राणी पक्षी दाखविण्यासाठी येत होते, अशी माहिती राणी बाग प्रशासनाकडून देण्यात आली.
गणेशोत्सवात राणी बागेत आलेले पर्यटक
३१ ऑगस्ट – ७,१४४
२ सप्टेंबर- ४,७७८
३ सप्टेंबर – १०,६४८
४ सप्टेंबर – १३,०८६
५ सप्टेंबर – ६, ७०१
६ सप्टेंबर – ४,५८५
८ सप्टेंबर – ४,१९९
९ सप्टेंबर – ३, ८१०
१० सप्टेंबर – ९,००१
११ सप्टेंबर – १७,८००