‘रामायण’ आणि ‘महाभारत’ ही महाकाव्ये भारतीय समाजात पिढ्यानपिढ्या वाचली जात आहेत. मानवी भावभावनांचे प्रतिबिंब या दोन महाकाव्यातील विविध पात्रांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. भारतीय संस्कृतीत आजही रामायण व महाभारतातील गोष्टी वाचूनच मुले लहानाची मोठी होतात. काळ आणि पिढी बदलली असली तरी ‘रामायण-महाभारता’ची गोडी कमी झालेली नाही. दूरचित्रवाहिन्यांवरील कार्टूनच्या जमान्यातही लहान मुलांना रामायण-महाभारताने भुरळ घातली आहे.
मराठी बालसाहित्यात गेल्या वर्षभरात छोट्या कथा, विज्ञानविषयक, शैक्षणिक, चित्रकला, नाटक, धार्मिक अशा विषयांवरील तब्बल ४५०हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मात्र यात रामायण-महाभारताच्या गोष्टींच्या पुस्तकांना मोठ्या प्रमाणात मागणी असून यात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे प्रकाशन व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.
‘रामायण’ आणि ’महाभारता’तील गोष्टी संस्कारक्षम वयातील मुलांपर्यंत पोहोचाव्यात आणि यातील पात्रांशी ओळख व्हावी, या उद्देशाने काही नामांकित प्रकाशक रामायण-महाभारतातील कथा गोष्टी रुपात प्रकाशित करीत आहेत. यात रामायणातील श्रावणबाळ, राम-सीता, लक्ष्मण, दशरथ, कैकयी, भरत, सीताहरण, जटायू , बिभीषण, रावण, सीतेची अग्निपरीक्षा तर महाभारतातील कर्ण, द्रोण, एकलव्य, भीष्म, द्रौपदी:स्वंयवर आणि वस्त्रहरण, भीम, युधिष्ठिर, बालकृष्ण, श्री कृष्ण, कुंती, अर्जुन, अभिमन्यू, गांधारी, दुर्योधन, अश्वत्थामा, धृतराष्ट आदी पात्रे असलेल्या गोष्टींचा समावेश आहे. पुस्तकातील रंगीत चित्रे मुलांच्या कुतूहलाचा भाग ठरत आहेत.
महाभारत आणि रामायणातील गोष्टी वाचल्याने मुलांचे एका अर्थाने मूल्यशिक्षण होत आहे. अर्जुनाची एकाग्रता, एकलव्याची गुरुभक्ती, अभिमन्यूचा साहसीपणा, हनुमानाची स्वामीनिष्ठा, राम-लक्ष्मणाचे बंधुत्व, रामाची पितृभक्ती, सुग्रीवाचे मित्रप्रेम अशा गुणाची ओळख मुलांचा होत असल्याची प्रतिक्रिया
काही प्रकाशकांनी लोकसत्ताकडे व्यक्त केली.
सध्या बालसाहित्यात रामायण-महाभारातातील गोष्टी बालवाचकांना अधिक आकर्षति करत आहेत. अशा पुस्तकांना वर्षभर मागणी असते. मात्र गेल्या काही महिन्यांत सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी ही मागणी वाढली आहे.
– निलेश सावंत, आयडियल
बुक डेपो, दादर
महाभारत, रामायणाची मुलांना ओळख व्हावी यासाठी ’रामायण महाभारतातील सुंदर गोष्टी’ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली. सुबोध आणि ओघवत्या शैलीत ते असल्याने बालवाचक आणि त्यांच्या पालकांकडून त्याला चांगली मागणी आहे.
– अनिल फडके, मनोरमा प्रकाशन