लहान भावाला निरोप देत तीन भावंडे ‘गायब’
नागपाडय़ात ते चार लहानगे खेळत बसले होते, अचानक सहा वर्षांची चिमुकली आपल्या लहान भावाला म्हणाली, ‘‘आम्ही खूप दूर जातोय, तू घरी जा.’’ लहान भाऊ घरी परतला, पण सहा वर्षांच्या त्या दोन मुली आणि एक चार वर्षांचा मुलगा परिसरातून गायब झाले. या घटनेस दोन दिवस उलटून गेले असूनही ही मुले सापडलेली नाहीत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून नागपाड पोलीस आणि गुन्हे शाखेने कसून तपास सुरू केला असला तरी ही मुले स्वत:हून कुठे आणि का गेली, याविषयी कमालीचे गूढ निर्माण झाले आहे.
नयानगर भागात राहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबातील एक सहा वर्षांची मुलगी तिचा चार वर्षांचा भाऊ आणि त्यांच्या नातेवाईकांच्या कुटुंबातील सहा वर्षांची मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा रविवारी दुपारी खेळत होते. तेव्हा सहा वर्षांच्या एका मुलीने आपल्या लहान भावाला घरी पाठवले. लहान भाऊ घरी आला तेव्हा घरचे पाणी भरण्यात गुंतल्याचे त्याने पाहिले. अंधार पडला तरी मुले परत आली नसल्याचे पाहून दोन्ही घरातील कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली, मात्र ते सापडले नाहीत. दोन्ही नातेवाईकांनी एकमेकांकडे विचारपूस केली तरीही त्यांचा थांगपत्ता लागला नाही. त्या वेळी लहान भावाने मोठय़ा बहिणीचा निरोप सांगित्यावर कुटुंबीयही बुचकळ्यात पडले. त्यांनी तातडीने नागपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. नागपाडा पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यास सुरुवात केली. त्या वेळी या दोन लहान मुली आणि चार वर्षांचा मुलगा स्वत:हून जात असल्याचे दिसून आले. तसेच, त्याच्या हातात एक खोकाही होता.
नागपाडा पोलिसांनी या मुलांच्या तपासासाठी एका विशेष पथकाची स्थापना केली असून गुन्हे शाखा कक्ष ३ याचा समांतर तपास करत आहेत.