पहिल्याच दिवशी चित्रकला, कवितांच्या तासाने जगण्याचा नवा धडा

त्या मुलांसाठी सारंच आश्चर्यकारक होतं. कालपर्यंत ही मुले सिग्नलवर भीक मागत होती तर कधी छोटय़ा-मोठय़ा वस्तू विकण्याचे काम करत होती. पाऊस असो की कडक उन्हाचा मारा, सिग्नलवर थांबणाऱ्या गाडय़ा हेच त्यांचे जगण्याचे साधन होते. गरिबीचे चटके आणि फटके सहन करत जगाच्या शाळेत शिकणाऱ्या या रस्त्यावरच्या मुलांसाठी खरोखरची शाळा सुरू झाली. चित्र काढण्यापासून कविता म्हणण्यापर्यंत ‘टीचर’ त्यांना शिकवत होते. हा अनुभव त्यांना वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाणारा होता.

ठाण्याच्या तीन हात नाक्यावरील पुलाखाली वर्षांनुवर्षे राहणाऱ्या मुलांसाठी तेथील सिग्नलपाशी पुलाखालच्या मोकळ्या जागेत नवीन शाळा बुधवारपासून सुरू झाली. सहा ते तेरा वर्षांपर्यंतच्या या मुलांसाठी ठाणे महापालिकेने कंटेनर दिला. वीज आणि पाण्याची सोय केली तसेच तेथील छोटय़ाशा मोकळ्या जागेला कुंपणही घालून दिले. ‘समर्थ भारत व्यासपीठ’ या ठाण्यासाठी सामाजिक संस्थेने रस्त्यावर सिग्नलपाशी राहणाऱ्या मुलांसाठी शाळा सुरू करण्याची योजना तयार केली. तीन हात नाका, कॅडबरी जंक्शन आणि माजिवडा येथील पुलाखाली बीड, जालना आणि उस्मानाबादच्या दुष्काळी भागातील मराठी कुटुंबे गेली अनेक वर्षे मुक्काम ठोकून आहेत. यातील काही जण पावसाळ्याचे चार महिने शेतीच्या कामासाठी गावी जातात आणि उर्वरित आठ महिने त्यांचा मुक्काम या पुलाखालीच असतो. यातील बहुतेकांचा कुटुंबविस्तार याच पुलाखाली झाला असून या मुलांसाठी नियमित शाळा काढण्याची संकल्पना ‘समर्थ भारत व्यासपीठ’ने तयार केली, तेव्हा पालिका आयुक्त संजय जैस्वाल आणि उपायुक्त मनीष जोशी यांनी संपूर्ण मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कंटेनर, वीज-पाणी व आवश्यक सुविधा त्यांनी संस्थेला दिल्या.

आज या शाळेत आलेल्या २० मुलांकडून तीन प्रार्थना शिक्षकांनी म्हणून घेतल्या. त्यांचा चित्रकलेचा, कवितांचा तासही घेण्यात आला. शाळेत येताना अंघोळ करून, केस व नखे कापून चांगली तयार करून या मुलांना आणण्यात आल्याचे संस्थेचे प्रमुख पदाधिकारी भटू सावंत यांनी सांगितले. खरे तर या मुलांच्या पालकांसाठी मुले ही उपजीविकेचे साधन आहे. त्यामुळे दिवसभर त्यांना शाळांत पाठवण्यास यातील काही पालक तयार नव्हते. तथापि ही मुले शिकली तर त्यांचे व तुमचेही भविष्य चांगले जाईल, हे समर्थ भारतने त्यांना पटवून दिले. आपल्यालाही आता शाळेत जायला मिळाले.  शाळा म्हणजे एक धमाल आहे. खेळ, गोष्टी, गाणी आणि अभ्यास.. त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद शाळेविषयी बरेच काही सांगून जात होता.

वाचनालय, प्रयोगशाळाही

या मुलांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्य विकासावर आधारित शिक्षण देण्यात येणार असून पुलाखालच्या या शाळेत मुलांसाठी वाचनालय तसेच छोटीशी प्रयोगशाळाही उभारण्यात आली आहे.

 

Story img Loader