विभक्त झालेल्या वा काडीमोड घेतलेल्या पालकांच्या भांडणामध्ये मुलांची फरफट नको आणि असे होणे म्हणजे मुलांचा सर्वागीण विकास खुंटवण्यासारखे आहे. उलट मुलाचा सर्वागीण विकास व्हायचा तर ताबा न मिळालेल्या पालकाचा सहवास, त्याचे प्रेम या मुलांना मिळणे आवश्यक आहे. तो त्यांचा अधिकारच आहे, असे स्पष्ट करत ख्रिसमसच्या सुट्टय़ांमध्ये पाल्याला भेटण्यास कुटुंब न्यायालयाने वडिलांना हिरवा कंदील दाखवला. एवढेच नव्हे, तर बापलेकाच्या या भेटीमध्ये आईने अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नये, असेही न्यायालयाने बजावले आहे.

कुटुंबातील सर्व जण सध्या एकत्र आले आहेत, असा दावा करत ख्रिसमसच्या सुट्टय़ा पाल्याला आपल्या आणि कुटुंबीयांसोबत घालवण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती वडिलांनी न्यायालयाकडे केली होती. दिवाळीच्या सुट्टय़ातही अशी परवानगी मिळाली होती. परंतु ही भेट मुलांसाठीच्या विशेष जागेतच करण्याची अट घालण्यात आली होती. मात्र अशी जागा उपलब्ध नसल्याने पाल्याला भेटताच आले नाही. त्यामुळे ख्रिसमसच्या सुट्टय़ांमध्ये निदान पाल्याला आपल्यासोबत राहण्याची मुभा देण्याचे वडिलांनी म्हटले होते. न्यायालयाने या विनंतीबाबत प्रतिवादी पत्नीला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. पण तिच्याकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देण्यात आला नाही. त्याची न्यायालयाने दखल घेतली. तसेच वडिलांना पाल्याचा केवळ एक दिवस ताबा हवा होता. त्यामुळे परिस्थितीचा विचार करता पाल्याचा ताबा मिळण्याची पतीची विनंती योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले.

दुसरे म्हणजे पतीच्या अर्जावर उत्तर देण्याचे सांगूनही तसेच कायदेशीर प्रक्रियेची जाणीव असूनही पत्नीकडून काहीच प्रतिसाद देण्यात आला नाही. यातून पाल्याचा ताबा वडिलांकडे देण्यास ती टाळाटाळ करत असल्याचेच स्पष्ट होत आहे. या सगळ्या बाबी आणि पाल्याचे कल्याण लक्षात घेता वडिलांना पाल्याचा ताबा मिळायला हवा, पाल्याचा त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रेमावर हक्क आहे, असा निर्वाळा न्यायालयाने दिला. ख्रिसमसच्या सुट्टय़ा संपेपर्यंत पाल्याचा दरदिवसाआड सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत वडिलांच्या ताब्यात देण्याचे आदेश न्यायालयाने महिलेला दिले आहेत. शिवाय तिने या भेटीमध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे आणू नयेत, असेही न्यायालयाने बजावले.

Story img Loader