शैलजा तिवले

पाच वर्षांवरील मुलांनाही लागण

लहान मुलांच्या हात-पाय-तोंडाला (हॅण्ड-फूट-माऊथ) होणाऱ्या विषाणूजन्य संसर्गाचे प्रमाण शहरामध्ये वाढले असून याचे स्वरूपही दरवर्षी बदलत असल्याचे दिसून येत आहे. सर्वसाधारणपणे पावसाळ्यामध्ये उद्भवणारा हा आजार पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळून येतो. मात्र या वर्षी सात-आठ वर्षांच्या बालकांनाही याची लागण होत असल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी नोंदविले आहे.

हात-पाय-तोंड हा विषाणूजन्य संसर्ग असून सर्वसाधारणपणे पाच वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये आढळून येतो. यामध्ये हात, पाय आणि तोंडाजवळ पुरळ येऊन मुलांना ताप येतो. यामध्ये तोंडामध्ये अल्सरदेखील येतो.  पावसाळ्यामध्ये ज्याप्रमाणे विषाणूजन्य संसर्गाची बाधा होऊन ताप,सर्दी, खोकला होतो, त्याचप्रमाणे हा संसर्गदेखील पावसाळ्यात उद्भवतो. मागील सात ते आठ वर्षांपासून हा संसर्ग दर पावसाळ्यामध्ये मुलांमध्ये होत असल्याचे आढळले आहे.  हा संसर्ग सप्टेंबर महिन्यामध्ये दिसून येत असे. या वर्षी मात्र जुलैपासूनच याची लागण झाल्याच्या तक्रारी घेऊन रुग्ण येत आहेत.

या आजाराचे बदलते स्वरूपही चिंताजनक आहे.  संसर्गजन्य आजाराची एकदा लागण झाल्यानंतर त्याच कालावधीमध्ये पुन्हा लागण होत नाही. परंतु या वर्षी एकाच मुलाला दोनदा या संसर्गाची लागण झाल्याचेही दिसून आले. विषाणूजन्य संसर्ग झाल्यानंतर त्या विषाणूचा सामना करण्याएवढी प्रतिकारशक्ती शरीरात निर्माण होते. त्यामुळे त्याच विषाणूची पुढील किमान सहा ते आठ महिने लागण होण्याची शक्यता नसते. परंतु या आजारात लागोपाठ दोनदा लागण होत असेल तर याचा अर्थ यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू संचार होत असून त्याचा संसर्ग होत असण्याचे शक्यता आहे, असे केईएम रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉ. मुकेश अगरवाल यांनी सांगितले.

आत्तापर्यंत हा संसर्ग झालेल्या मुलाच्या कोपरावर, तळहातावर किंवा गुडघ्यावर पुरळ आणि तोंडामध्ये अल्सर येत असे. परंतु या आजाराचे बाह्य़रूप बदलत असून आता काही मुलांच्या तोंडामध्ये अल्सर मोठय़ा प्रमाणात दिसतो. मात्र त्वचेवर कोणतेही पुरळ दिसत नाहीत. काही रुग्णांमध्ये याच्या उलट अंगावर पुरळ असतात. परंतु तोंडामध्ये अल्सर नसतो. साधारण आठ ते दहा दिवसांमध्ये हा संसर्ग बरादेखील होतो. मात्र अशाच रीतीने याचे स्वरूप बदलत राहिले तर काही वर्षांनी याचे गंभीर स्वरूप निर्माण होण्याची शक्यता आहे, असेही डॉ. अगरवाल यांनी सांगितले.

दहा वर्षांपूर्वी हा आजार आपल्याकडे नव्हताच. दुसऱ्या देशातून याचे विषाणू भारतात आल्याने गेल्या सात-आठ वर्षांपासून याचे रुग्ण आढळून येत आहेत. पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळून येणारा या आजाराची लागण या वर्षी अगदी नऊ वर्षांच्या मुलांनाही झाल्याचे पाहण्यात आले. गेल्या महिनाभरापूर्वी या आजाराच्या रुग्णांची संख्याही झपाटय़ाने वाढली होती. दिवसाला किमान चार ते पाच रुग्ण येत होते. पूर्वी हात-पाय-तोंड या भागामध्ये पुरळ येत होते. परंतु आता सर्वागावरच पुरळ येत असून त्यामध्ये पाणी होऊन फोड आल्याप्रमाणे याचे बाह्य़रूप दिसत आहे. त्यामुळे बऱ्याचदा पालकांना कांजण्या असल्याचा संभ्रम होत असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मेधा पाटील यांनी व्यक्त केले.

घ्यावयाची काळजी

* संसर्गजन्य आजार असल्याने इतर मुलांना होण्याची शक्यता असल्याने पूर्ण बरा होईपर्यंत मुलांना शाळेत पाठवू नये.

* पुरळमुळे अंगाची खाज होत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मलमचा वापर करावा.

* तोंडामध्ये अल्सर आल्याने मुलांना खाता येत नाही. तेव्हा पातळ पदार्थ किंवा जास्त चावावे लागणार नाहीत असे हलके पदार्थ जेवणामध्ये द्यावेत.

आजाराची लक्षणे : तळपाय, तळहात, कोपर, गुडघा आदी ठिकाणी पुरळ येणे, तोंडामध्ये अल्सर होणे, ताप येणे