मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे ८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत शहरातील ४५ ठिकाणी ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा २०२२-२३’चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा चार गटांमध्ये घेण्यात येणार आहे.
इयत्ता पहिली आणि दुसरीतील विद्यार्थ्यांच्या गट क्रमांक एकसाठी ‘मी आणि माझा फॅन्सी ड्रेस’, ‘मी आणि माझी आई’, ‘मी व फुलपाखरू’, इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या गट क्रमांक दोनसाठी ‘माझ्या बाहुलीचे लग्न’ , ‘मी मेकअप करतो / करते’, ‘मी व माझा आवडता प्राणी’, इयत्ता सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या गट क्रमांक तीनसाठी ‘आम्ही व्यायाम करतो / करते’, ‘आम्ही वर्ग / शाळा सजावट करतो’, ‘आम्ही बागेत खेळतो’, तर इयत्ता नववी ते दहावीतील विद्यार्थ्यांच्या गट क्रमांक चारसाठी ‘माझ्या स्वप्नातील मुंबई’, ‘देशाच्या प्रगतीत महिलांचे मोलाचे योगदान’ व ‘सांघिक खेळातील जिंकण्याची जिद्द’ असे विषय निश्चित करण्यात आले आहेत.
या चारही गटातील स्पर्धकांसाठी एकूण ५५२ रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. याअंतर्गत प्रत्येक गटासाठी प्रथम (२५ हजार रुपये), द्वितीय (२० हजार रुपये) आणि तृतीय (१५ हजार रुपये) पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर, प्रत्येकी ५ हजार रुपयांची १० पारितोषिके देण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक विभाग स्तरावर उत्तम चित्रांसाठी ५०० रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रत्येक स्पर्धकाला प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ७७७७-०२५-५७५ वर संपर्क साधावा किंवा http://www.balchitrakala.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.