लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरात सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत ४० मेट्रीक टन चायनीज फटाके जप्त करण्यात आले. त्यांची किंमत ११ कोटी रुपये आहे. स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारे ब्रश व मॉपच्या नावाने फटाक्यांची तस्करी करण्यात येत होती.
सीमाशुल्क कायद्याअंतर्गत फटाक्यांच्या आयातीवर प्रतिबंध आहे. फटाक्यांच्या आयातीसाठी परदेशी व्यापार महासंचलकांकडून विशेष परवाना दिला जातो. फटाक्यांच्या आयातीबाबत अनेक नियम आहेत. विशेष करून त्यात जस्त व लिथीयन यांच्या प्रमाणाबाबत काही नियम आहेत. त्याच्या अधिक मात्रेमुळे श्वसनाचे आजार होऊ शकतात. पण त्यानंतरही इतर वस्तूंच्या नावाखाली चीनमधून फटाक्यांची तस्करी केली जात असल्याची अनेक प्रकरणे उघड झाली आहेत.
आणखी वाचा-राज्यात २६४ नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी इरादा पत्र मंजूर
सीमाशुल्क विभागाला नुकतीच ४० फुटांच्या कंटेनरमध्ये चीनमधून फटाके आणण्यात आल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाने न्हावा शेवा परिसरात हा कंटेनर अडवला. त्याची तपासणी केली असता त्यात विनापरवाना फटाके आणण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून ते जप्त करण्यात आले. फटाक्यांची आयात करणाऱ्या व्यक्तीबाबत सीमाशुल्क विभाग अधिक तपास करीत आहे.