नव्या समितीच्या चौकशीतून पितळ उघडे पडेल?
सिंचन घोटाळ्याचे आरोप आणि गेल्या दहा वर्षांंतील सिंचन क्षेत्रवाढीचा वाद या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने चौकशी पथकाचे प्रमुखपदी नियुक्ती केलेले डॉ. माधवराव चितळे यांनी राज्यातील सिंचनक्षमता वाढल्याची शक्यता यापूर्वीच व्यक्त केली होती. विशेष म्हणजे सिंचनाचे क्षेत्र वाढल्याचा दावा करताना जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात डॉ. चितळे यांच्या या विधानाचाच आधार घेतला होता.
सुमारे ७० हजार कोटी खर्च करून सिंचनाच्या क्षेत्रात ०.१ टक्के वाढ झाल्याचा दावा कृषी खात्याने केला आहे. तर सिंचनाचे क्षेत्र ५.१७ टक्के वाढल्याचा जलसंपदा विभागाचा दावा आहे. नक्की कोणाचे बरोबर हा वादाचा मुद्दा ठरला आहे. या संदर्भात विविध तज्ज्ञांनी विविध मते मांडली होती. गेल्या दहा वर्षांमध्ये शहरी भागाची झालेली वाढ, सिंचनाची वसुली वाढणे यामुळे सिंचनाच्या क्षेत्रात नक्कीच वाढ झाल्याचे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी व्यक्त केले होते. पाण्याचे क्षेत्र मोजण्यात जलसंपदा, कृषी आणि महसूल विभागांमध्ये काही तरी गल्लत होत असेल, असेही त्यांचे म्हणणे होते. सिंचनाचे नक्की क्षेत्र किती वाढले हा वाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित झाला होता. फक्त ०.१ टक्के सिंचनाचे क्षेत्र वाढले हा विरोधकांचा आरोप फेटाळून लावताना जलसंपदामंत्री तटकरे यांनी पावसाळी अधिवेशनात विधानसभेत चर्चेला उत्तर देताना डॉ. चितळे यांच्या विधानाचा आधार घेतला होता. डॉ. चितळे यांनी व्यक्त केलेले मतच तेव्हा तटकरे यांनी सभागृहात वाचून दाखविले होते.
सिंचन क्षेत्रात नक्कीच वाढ झाल्याचा डॉ. चितळे यांचा दावा लक्षात घेता नाहक वाद उपस्थित करणे योग्य नाही, असेही तटकरे तेव्हा म्हणाले होते. डॉ. चितळे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समिती तांत्रिक बाबींचीच चौकशी करण्याची शक्यता आहे.
डॉ. चितळे यांचा सरळमार्गी स्वभाव पाहता, घोटाळ्यांच्या आरोपांबाबत त्यांच्या अहवालात मतप्रदर्शन होण्याची शक्यता फारच कमी असल्याचे बोलले जाते.     

Story img Loader