उमाकांत देशपांडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या कपड्यांवरून आक्षेप घेत भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सुरू केलेला वाद वरिष्ठ नेत्यांना फारसा रुचलेला नसल्याने त्यांनी वाघ यांचे समर्थन केलेले नाही. पोलिस उर्फीला अटक का करीत नाहीत, असा जाहीर आक्षेप वाघ यांनी घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याला लक्ष्य केल्याने वाघ या पक्षात एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उर्फीने स्त्री म्हणून काहीही वावगे केलेले नाही, असा निर्वाळा खुद्द अमृता फडणवीस यांनीही दिल्याने वाघ यांना आता हा वाद आवरावा लागण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा >>> Video : उर्फी जावेदचं ‘ते’ कृत्य पाहून तुमचाही होईल संताप, विमानतळावरच केलं असं काही की…

उर्फी जावेद हिचा नंगा नाच चालू देणार नाही, असा इशारा देत चित्रा वाघ यांनी तिच्या कपड्यांवरुन आक्षेप घेतले. तिला अटक करण्याची मागणी करीत पोलिस आयुक्तांकडे तक्रारही दाखल केली. पण पोलिस कारवाई करीत नसल्याने आणि उर्फी त्यांना रोज डिवचत असल्याने वाघ संतापल्या असून त्यांचे व उर्फी जावेद यांचे ट्विटर युद्ध सुरूच आहे. उर्फीने वाघ यांचा उल्लेख ‘ माझी सासू ‘ असा केल्याने समाजमाध्यमांवर आणि जनतेमध्येही या कपड्यांवरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद उमटत आहेत.

हेही वाचा >>> “उर्फी जावेदचा नंगानाच सावित्रीच्या लेकींना..” चित्रा वाघ पुन्हा एकदा आक्रमक

जनतेचे प्रश्न व अन्य महत्वाचे मुद्दे सोडून भाजप नेते किरकोळ गोष्टींवरून वाद का उकरून काढत आहेत, अशी चर्चा सुरू आहे. फडणवीस गृहमंत्री असताना पोलिस कारवाई करीत नाहीत, याचा अर्थ त्यांनाही हा वाद नापसंत असताना अमृता फडणवीस यांनी तर जाहीरपणेच उर्फीने काहीच वावगे केले नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रत्येकाची वेगळी मते असू शकतात, त्यामुळे चित्रा वाघ यांनी त्यांची मते मांडली. पण उर्फी जावेद ही सुद्धा आपले करियर करीत असून तिने चुकीचे काहीच केलेले नाही, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केल्याने चित्रा वाघ यांची पंचाईत झाली आहे. भाजप नेतेही उघडपणे चित्रा वाघ यांना समर्थन देत नसल्याने त्यांना हा जाहीर वाद संपवावा लागण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chitra vagh alone in bjp seniors also upset because of the controversy urfi javed print politics news ysh