भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या गुजरात भेटीवरून जोरदार टोले लगावले आहेत. महापौर पेंग्विन पाहण्यासाठी ५५० किलोमीटर प्रवास करून गेल्या, मात्र त्यांना वरळीत सिलेंडर स्फोटात तडफडून जीव सोडलेल्या लहानग्या बाळासाठी साडेआठ मिनिटांचा प्रवास करावा वाटला नाही, असा आरोप करत चित्रा वाघ यांनी किशोरी पेडणेकरांना लक्ष्य केलं. तसेच महापौरांनी त्यांच्या युवराजांना पेंग्विन म्हणतात हेही स्वतःच कबूल केल्याचं म्हणत टोला लगावला.
चित्रा वाघ म्हणाल्या, “मुंबईच्या सन्माननीय महापौर किशोरी पेडणेकर यांचं पेंग्विन प्रेम आज जगजाहीर झालं. त्या स्वत: ५५० किमी प्रवास करत पेंग्विनच्या भेटीला गेल्या, पण वरळी येथे सिलेंडर स्फोटात तडफडून जीव सोडलेल्या लहानग्या बाळासाठी साडेआठ मिनिटांचा प्रवास करण्याची त्यांना आवश्यकता वाटली नाही.”
“युवराजांना पेंग्विन म्हणतात हेही महापौरांनी स्वतःच जाहीरपणे कबूल केले”
“त्यांच्या युवराजांना पेंग्विन म्हणतात हेही किशोरी पेडणेकरांनी स्वतःच जाहीरपणे कबूल केले आणि युवराज यासाठी त्यांचं अभिनंदनही करतीलच,” असं म्हणत चित्रा वाघ यांनी पेडणेकरांना टोला लगावला.
चित्रा वाघ म्हणाल्या, “महापौर किशोरी पेडणेकरांनी जी गुजरातमध्ये मिळालेल्या आदरतिथ्याची तारीफ केली ती मुळात आपली हिंदू संस्कृती आहे. पण आपल्याला सध्या सुल्तानशाहीची जवळीक वाटत असल्यामुळे हिंदूच्या परंपरेविषयी आपण भारावून जाणं स्वाभाविक आहे.”
हेही वाचा : आदित्य ठाकरेंना पेंग्विन युवराज म्हणता, मग…; महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या
“आज सर्व मुंबईकरांना हे तर कळून चुकले आहे की सत्ताधारी सेना ही फक्त पेंग्विनसाठी आणि हायवे कन्स्ट्रक्शनच्या भल्यासाठी काम करते आणि मुंबईकरांच्या दैनंदिन समस्येवरती त्यांना काही देणं घेणं नाही,” असं म्हणत चित्रा वाघ यांनी पेडणेकर आणि शिवसेनेवर गंभीर आरोप केले.