नव्या संसदेचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते न केल्याने आणि त्यांना या कार्यक्रमाला आमंत्रितही न केल्याचं कारण सांगत देशातील विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावरच बहिष्कार टाकला. तसेच या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर वारंवार शाब्दिक हल्ला चढवला. या पार्श्वभूमीवर आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर देत संवैधानिक इमारतींचे उद्घाटन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची यादीच सांगितली. त्यांनी ट्वीट करत आपली भूमिका मांडली.
चित्रा वाघ म्हणाल्या, “‘पप्पू फिर फेल हो गया’. राहुल गांधी पप्पू आहेत हे जगजाहीर आहे. तरी पण वारंवार पप्पू असल्याचं सिद्ध करण्याची हुक्की त्यांना का येते हे कळत नाही. खरंच त्यांचा अभ्यास कच्चा आहे.”
“असे कितीही मांजर-बोके आडवे गेले तरी मोदींचा रथ रोखता येणार नाही”
“राहुल गांधींनी नवीन संसद भवन उद्घाटनावर बहिष्कार टाकून अपशकुन आणण्याचा प्रयत्न केला, पण असे कितीही मांजर-बोके आडवे गेले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकास रथ रोखता येणार नाही,” असं चित्रा वाघ यांनी म्हटलं.
हेही वाचा : “अहंकाराच्या विटा रचून संसद….” राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका
“बहिष्कार टाकणाऱ्यांनी आपल्या पूर्वजांचा इतिहास पाहावा”
“संसदेसारख्या पवित्र मंदिरावर बहिष्कार टाकणाऱ्यांनी आपल्या पूर्वजांचा इतिहास पाहावा. विरोध करणाऱ्यांचा बुरखा टराटरा फाटलाय,” असं म्हणत चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला.
यावेळी चित्रा वाघ यांनी विधान सभा भवन आणि संसदेच्या इमारतींचे उद्घाटन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची आणि अशा घटनांची यादीच वाचून दाखवली. ती यादी खालीलप्रमाणे…
इंदिरा गांधी – संसदेच्या अॅनेक्स इमारतीचे उद्घाटन केले.
इंदिरा गांधी – महाराष्ट्राच्या विधान भवनाचे उद्घाटन इंदिरा गांधींच्या हस्ते झाले.
राजीव गांधी – संसदेच्या लायब्ररी इमारतीचे उद्घाटन केले.
मनमोहन सिंग – सोनिया गांधींनी मणिपूरच्या इंफाळ येथे विधान भवनाचे उद्घाटन केले.
नितीश कुमार – नितीश कुमारांच्या हस्ते बिहार विधान भवनाच्या सेंट्रल हॉलचे उद्घाटन झाले.
तामिळनाडू विधानसभेच्या उद्घाटनाला सोनिया गांधी हजर होत्या. राज्यपालांना बोलावलं नाही.
तरुण गोगोई – आसाम विधानसभेचे उद्घाटन काँग्रेसचे नेते तरुण गोगोई यांच्या हस्ते झाले.
आंध्रच्या मुख्यमंत्र्यांनी २०१८ मध्ये विधानभवनाचे उद्घाटन केले.