मुंबई : विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बारा जागांवर सात जणांच्या नावांची शिफारस राज्यपाल सी. पी. राधाकृष्णान यांच्याकडे करण्यात आली आहे. यात भाजपचे तीन, तर शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या प्रत्येकी दोन नावांचा समावेश आहे. राज्यपालांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या नियुक्त्या करणे अपेक्षित असताना राजकीय नेत्यांचीच वर्णी लावली जात असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी राज्य सरकारने घाईघाईने निर्णय घेत राज्यपालांकडे शिफारस केली. यात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि पोहरादेवी येथील धर्मगुरू बाबूसिंग महाराज राठोड यांची नावे देण्यात आली आहेत. शिंदे गटाच्या कोट्यातून माजी खासदार हेमंत पाटील आणि  प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे तर अजित पवार गटाकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवडी यांची वर्णी लावण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी मिळाल्यावर घाईने राज्यपालांच्या मान्यतेसाठी फाईल पाठविण्यात आली आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत नियुक्तीचे आदेश काढण्यात आले नव्हते. १२ पैकी पाच जागा अद्याप ठेवण्यात आल्या आहेत. या जागांसाठी इच्छुकांना आशेवर झुलवत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>>मुंबईच्या वेशीवर टोलमाफी; हलकी वाहने, एसटी, शाळेच्या बस पथकरातून मुक्त, तिजोरीवर एक हजार कोटींचा आर्थिक भार

याचिका प्रलंबित

महाविकास आघाडी सरकारच्या काळात १२ आमदारांच्या नावांची शिफारस करण्यात आली होती. त्यांना तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली नव्हती. शिंदे-फडणवीस सरकारने आधीची १२ नावांची यादी मागे घेतली आणि आता नव्याने सात नावांची शिफारस करण्यात आली आहे. आधीच्या सरकारची नावे मागे घेण्याच्या निर्णयास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून याचिका प्रलंबित आहे. अडीच वर्षात न झालेल्या नियुक्त्या महिनाभरात होणार नाहीत, अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली होती व नियुक्त्यांना स्थगिती दिली नव्हती. महाधिवक्त्यांनीही याबाबत न्यायालयात निवेदन केले होते.

हेही वाचा >>>कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

संधी मिळालेले नेते

चित्रा वाघ :

– भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा

– राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्यावर प्रवक्त्या म्हणून काम

– विरोधकांवर आक्रमकपणे टीकास्त्र सोडणाऱ्या, महिला अत्याचारांविरोधात आवाज उठविणाऱ्या नेत्या अशी ओळख.

विक्रांत पाटील :

– पनवेलचे माजी उपमहापौर

– भाजपचे विद्यामान प्रदेश सरचिटणीस

– प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खास मर्जीतील असल्याची चर्चा

धर्मगुरु बाबूसिंग महाराज राठोड :

– बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या विदर्भातील पोहरादेवीच्या गुरुगादीचे पीठाधीश

– बंजारा समाजात मानाचे स्थान

हेमंत पाटील :

– शिवसेनेचे हिंगोलीचे माजी खासदार

लोकसभा निवडणुकीत पत्नी राजश्री पाटील यांचा पराभव

– लोकसभेत उमेदवारी नाकारल्यानंतर विधिमंडळात वर्णी

डॉ. मनीषा कायंदे :

– विधानसभा मतदारसंघातून विधानपरिषदेच्या आमदार

– शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटात प्रवेश

शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून अनेक वर्षे कार्यरत

पंकज भुजबळ :

– नांदगावमधून दोनवेळा विधानसभेवर निवड

– मंत्री छगन भुजबळ यांचे चिरंजीव

इद्रिस नायकवडी :

– सांगलीचे माजी महापौर

– राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुस्लिम नेत्याला संधी

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chitra wagh pankaj bhujbal were named by the state government for governor appointed mlas on the legislative council amy