मुंबई : भारतातर्फे ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी ‘छेल्लो शो’ची निवड करताना फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड समितीने नियमांचे पालन केले नसल्याचा दावा ‘एफडब्ल्युआयसीई’ या चित्रपट संघटनेने केला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एमप्लोईज या संघटनेने ‘छेल्लो शो’च्या निवडीबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ऑस्करसाठी भारतातर्फे चित्रपट पाठवताना त्याची निर्मिती भारतीय निर्मिती संस्थेची असायला हवी. मात्र छेल्लो शो या चित्रपटाची निर्मिती ऑरेंज स्टुडिओ नामक परदेशी स्टुडिओची असून गेली काही वर्षे या चित्रपटाचा उल्लेख त्यांच्या संकेस्थळावर होता. हा चित्रपट अलिकडेच भारतात प्रदर्शित करण्यासाठी एका भारतीय वितरण कंपनीने घेतला, असा दावा संघटनेच्या पत्रकात करण्यात आला आहे. अशा पद्धतीने भविष्यात परदेशी कंपनी भारतीय निर्मिती संस्थेबरोबर संयुक्त पद्धतीने भारतीय चित्रपटाची निर्मिती करतील आणि भविष्यात त्यावर हक्क गाजवतील, अशी भीती यात व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच या चित्रपटाचा प्रीमिअर गेल्या वर्षी जूनमध्ये करण्यात आला असताना २०२२ च्या स्पर्धेसाठी हा चित्रपट निवडीस पात्र ठरतो का? यासंदर्भात फेडरेशनचे नियम काय आहेत? आणि तसा तो पात्र ठरत असेल तर तशी समान संधी त्या वर्षीच्या इतर चांगल्या चित्रपटांना मिळालेली नाही, असेही नमूद करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या पोस्टरपासून कथेपर्यंत ऑस्कर विजेत्या पॅरेडीसो चित्रपटाचा प्रभाव असल्याची चर्चा आहे. ऑस्कर समितीचे या संदर्भातील नियम कठोर असतात, तरीही हा धोका का पत्करला, असे काही प्रश्न एफडब्ल्युआयसीईचे अध्यक्ष बी. एन. तिवारी आणि अशोक पंडित यांनी उपस्थित केले आहेत. याची गंभीर दखल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.