कार्टून वाहिन्यांवरील युद्धात मिकी माऊस, त्याची मैत्रीण मिनी, मिकीचा मित्र डोनाल्ड डक, डेझी, गुफी आणि प्लुटो या जगविख्यात मातब्बर ‘डिझ्ने’वीरांना छोटा भीमसारख्या अस्सल भारतीय व्यक्तिरेखांनी अक्षरश: चीतपट केले आहे. कार्टून वाहिन्यांवर स्वदेशी व्यक्तिरेखांना मिळत असलेल्या तुफान प्रतिसादामुळे अ‍ॅनिमेशनमधील पहिल्या क्रमांकाचा ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ८५ वर्षांच्या मिकी माऊससारख्या जुन्या कार्टून व्यक्तिरेखांची ओळखही बच्चेकंपनी विसरत चालली आहे. डिझ्ने इंडियाने याची गंभीर दखल घेतली असून, आपल्या चिमुकल्या ‘ग्राहक-प्रेक्षकां’च्या मनामध्ये पुन्हा एकदा या व्यक्तिरेखा रुजाव्यात यासाठी मिकी आणि कंपनीचा भारतदौरा आखण्यात आला आहे.  
छोटा भीम आणि त्याची मित्रमंडळी, माईटी राजू, कुंभकरण अशी अनेक देशी कार्टून्स आजघडीला कार्टून वाहिन्यांवर ठाण मांडून आहेत. डोरेमॉन, शिनचॅन ही जपानी कार्टून्सही लोकप्रिय असली तरी अ‍ॅनिमेटेड मालिका, चित्रपट आणि लहान मुलांच्या अगदी बिस्किटांपासून ते शाळेच्या दप्तरांपर्यंतच्या अनेक उत्पादनांवर छोटा भीमची शिरजोरी आहे. छोटा भीमच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे टीआरपीच्या स्पर्धेत डोरेमॉन, शिनचॅन ही मंडळी कधीच मागे पडली आहेत. या सगळ्याचा मोठा फटका मिकी माऊससारख्या जुन्या लोकप्रिय कार्टून्सना बसला आहे. १९२८ साली आलेल्या ‘स्टीमबोट विली’ मधून आलेल्या वॉल्ट डिझ्नेच्या या मिकी माऊसला भारतात ८६ टक्के प्रेक्षक ओळखतात, अशी माहिती डिझ्ने इंडियाच्या रिटेल विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक रोशनी बक्षी यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. पण या मिकीला छोटा भीम आदी कंपनीने मागे टाकले आहे. मिकी आणि त्याच्या मित्रांच्या गोष्टी, त्यांच्या विश्वातील गमतीजमती येथील मुलांपर्यंत नव्याने पोहोचवण्याची गरज असल्याचे मत बक्षी यांनी व्यक्त केले, म्हणूनच मिकी माऊसच्या भारत दौऱ्याचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि चेन्नई या चार मोठय़ा शहरांमध्ये दौरा आयोजित करण्यात आला आहे. मुलांना आकर्षित करण्यासाठी बॉलीवूडच्या चित्रपटातील लोकप्रिय गाण्यांचाही वापर करण्यात येणार असून आंटी जी, डिस्को दिवाने अशा गाजलेल्या गाण्यावर मिकी माऊस नाचणार आहे आणि मुलांनाही नाचवणार आहे. देशी कार्टून्सच्या भीमटोल्यामुळे आपली ओळख पुसली जाऊ नये यासाठी डिझ्नेला परिघाबाहेर पडून हातपाय हलवणे भाग पडले आहे.