मुंबई : दक्षिण मुंबईतील उमरखाडी येथील २५ कोटी रुपये किमतीची इमारत बळकवल्याच्या आरोपाखाली कुख्यात छोटा शकीलचा साडू सलीम फ्रुट याच्यासह पाच जणांना खंडणीविरोधी पथकाने सोमवारी अटक केली. ती इमारत सलीम फ्रुटची पत्नी शाझीया हिच्या नावावर करण्यात आली होती. इमारतीच्या मालकाचा २००६ मध्ये मृत्यू झाला असताना २०११ मध्ये त्याने इमारतीची विक्री केल्याचे दाखवण्यात आले. त्यासाठी बनावट कागदपत्रे व तोतया मालक उभा करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
मोहम्मद सलीम इकबाल कुरेशी ऊर्फ सलीम फ्रुट (४९), मुस्लीम असगरअली अमरेटवाला (६२), शेरझादा जंगरेज खान (६३), अस्लम अब्दुल रेहमान पटनी (५६) व रिजवान अलाउद्दीन शेख (३५) अशी अटक आरोपीची नावे आहेत. आरोपींविरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, फौजदारी विश्वासघात केल्याप्रकरणी २२ सप्टेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तक्रारदार सनदी लेखापाल असून सध्या दक्षिण आफ्रिकेत राहतात. दक्षिण मुंबईतील उमरखाडी रोड येथील लम्बात इमारत ही तक्रारदार यांच्या वडिलांच्या मालकीची होती. त्यांच्या वडिलांचे २००६ मध्ये निधन झाले.