ahawwur Rana Mumbai 26/11 Attack : मुंबईतील २६/११ चा सूत्रधार तहव्वूर राणाच्या भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणासाठी हिरवा सिग्नल दिल्यानंतर भारतानेही हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भारतीय पथक रविवारी अमेरिेकेत दाखल झाले होते. आज ते तहव्वूर राणाला घेऊन भारतात परतणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, तो भारतात आल्यानंतर त्याची अजमल कसाबसारखी मिजास करू नका, त्याला बिर्याणी खायला घालू नका, अशी आर्त विनवणी २६/११ हल्ल्यात अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या छोटू चहावाल्याने केली आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता.

छोटू चहवाल्याचं नाव मोहम्मद तौफीक आहे. मुंबईत २००८ साली झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यावेळी त्याने अनेक लोकांचे प्राण वाचवले होते. त्याच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली होती. त्यामुळे तहव्वूर राणा भारतात परतणार असल्याच्या वृत्तावर त्याने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “मी सगळ्यात आधी डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिका सरकारचे आभार मानतो. एवढ्या मोठ्या मास्टरमाईंडला त्यांनी भारताकडे सोपवलं आहे. पण भारताचं काय काम आहे? अजमल कसाबला दिली तशी अंडा सेल, बिर्याणीसारखी सेवा देण्याची गरज नाही. दहशतवाद्यांसाठी वेगळा कायदा तयार केला गेला पाहिजे. अशी यंत्रणा राबविली पाहिजे की त्यांना दोन ते तीन महिन्यांत फाशीची शिक्षा झाली पाहिजे किंवा त्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत.”

बिर्याणी खाऊ घालू नका, पैशांचा अपव्यय करू नका

छोटू चहावाला पुढे म्हणाला, “त्याला आणून बिर्याणी खायला द्या. त्याच्यावर करोडो रुपये खर्च करा. हा पैशांचा अपव्यय आहे. तो येतोय तर कोणतेही उपकार करत नाहीत. आपल्या देशात येऊन त्यांनी दहशतवादी हल्ला केला आहे. त्याच्यामुळे किती लोक मारले गेले. दुबई आणि सौदीमध्ये चोरी करणाऱ्या चोरांचेही हात कापून दिले जातात. येथेही दहशतवाद्यांसाठी अशी यंत्रणा बनवली पाहिजे. जलद गतीने हे प्रकरण चाललं पाहिजे.”

१५ दिवसांच्या आत फाशी द्या

“मी तो दिवस पाहिला आहे. त्यादिवशी किती लोक मारले गेले. बकरी ईदचा सण होता. कितीतरी लोक बेघर झाले. किती लोकांचे आई-वडील गेले. कोणाचा भाऊ-बहिण गेले. सरकारने आपलं काम कायद्याने केलं पाहिजे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींकडे विनंती करतो की १५ दिवसांच्या आत त्याला फाशी मिळाली तर चांगलं होईल. त्याला लोकांमध्ये सोडलं तर पाकिस्तानातील दहशतवाद्यांमध्ये भीती निर्माण होईल”, असंही तो म्हणाला.

मोहम्मद तौफिक पुढे म्हणाला, “या प्रकरणाला आता १६ ते १७ वर्षे झाली. पैसे (नुकसान भरपाई) देऊन काही उपयोग नाही. त्याला जास्त दिवस ठेवू नका. त्याच्यावर जास्त वेळ खर्ची करू नका. त्याला फाशी दिली जाईल तेव्हा मी उत्सव साजरा करेन. फटाके फोडेन. प्रत्येकाला न्याय मिळेल. आतापर्यंत न्याय मिळालेला नाही.”