धर्मशाळेला तडे, अपुरा पाणी पुरवठा, तुटलेले नळ, स्वच्छतागृहांची दुरावस्था आणि जागोजागी मातीचे ढिगारे अशी अवस्था चुनाभट्टी येथील हिंदू स्मशानभूमीची आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही पालिका अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी पालिकेविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
चुनाभट्टी आणि कुर्ला परिसरातील नागरिकांसाठी चुनाभट्टी स्मशानभूमी ही या परिसरातील एकमेव स्मशानभूमी आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे. धर्मशाळेची इमारत अनेक वर्षे जुनी असून काही महिन्यांपूर्वी तिची डागडुजी करण्यात आली. मात्र सध्या या धर्मशाळेच्या पिलरला मोठ्या प्रमाणात तडे गेल्याने ती कोसळण्याची भीती नागरीकांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा >>> अटल सेतूमुळे ४० मिनिटांची बचत, एसटीच्या ताफ्यातील शिवनेरीची धाव अटल सेतूवरून
स्मशानभूमीत हातपाय धुण्यासाठी अपुरा पाणी पुरवठा असून केवळ एकच नळ बसवण्यात आला आहे. मात्र तो देखील वारंवार तुटत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तेथे महिलांसाठी एकही स्वछतागृह नाही. संपूर्ण स्मशानभूमीत लावण्यात आलेले पेव्हर ब्लॉक्स निघाले असून पावसाळ्यात तर नागरीकांना अधिकच मनस्ताप सहन करावा लागत आहे. तेथील पालिका कर्मचारी कार्यालयाचीही दयनीय अवस्था असून पावसाळ्यात संपूर्ण कार्यालयात मोठ्या प्रमाणात पाणी ठिबकत असल्याने कर्मचाऱ्यांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. स्मशानभूमीतील सर्व समस्यांची माहिती पालिकेच्या एल वार्ड कार्यालयातील अधिकाऱ्यांना आहे. मात्र पालिका तेथील समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे पालिकेने तत्काळ याची दखल घेऊन येथील कामे मार्गी लावावी अन्यथा पालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढावा लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ता जितेंद्र जाधव यांनी दिला आहे.