बहुप्रतिक्षित चर्चगेट-डहाणू उपनगरी गाडीच्या प्रवासाला येत्या २८ मार्चचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. त्याचवेळी पश्चिम रेल्वेच्या उपनगरी ताफ्यातील शेवटची नऊ डबा गाडीही आपला शेवटचा प्रवास करणार आहे. शनिवार-रविवारच्या रात्री विरार ते डहाणू उपनगरी गाडीची चाचणी घेण्यात आली असून आता २८ मार्चपासून तिचा नियमित प्रवास सुरू होणार असल्याचे पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. पुढील आठवडय़ात जास्त सुटय़ा असल्यामुळे केवळ गुरुवार, २८ मार्च हाच दिवस या प्रवासासाठी योग्य असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. चर्चगेट-डहाणू या प्रवासाला अडीच तास लागणार असून काही फेऱ्या अंधेरी आणि काही फेऱ्या बोरिवली येथून चालविण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांच्या ताफ्यात आता उरलेल्या एकमेव नऊ डब्यांच्या गाडीच्या फेऱ्याही याच दिवशी संपणार असून आता पश्चिम रेल्वेच्या सर्व गाडय़ा १२ डब्यांच्या होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पश्चिम रेल्वेच्या १२५० फेऱ्यांपैकी केवळ १० फेऱ्या नऊ डब्यांच्या होत्या. अलीकडेच पश्चिम रेल्वेला तीन नव्या गाडय़ा मिळाल्या असून त्यातील एक गाडी यापूर्वीच प्रवाशांच्या सेवेत आणण्यात आली आहे. पुढील आठवडय़ात उर्वरित दोन्ही गाडय़ाही सेवेत आणल्या जाणार असून त्यामुळेच नऊ डब्यांची गाडीचा प्रवास थांबणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा