निविदा न मागविताच कंत्राटदारांना कामे देणे आणि तांत्रिक सल्लागार समितीच्या शिफारशींकडे दुर्लक्ष करणे यामुळे मुंबई महापालिकेत मोठय़ा प्रमाणावर घोटाळे झाल्याचा ठपका भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग)ने ठेवला आहे. त्यामुळे ‘कॅग’ने ठपका ठेवलेल्या सर्व प्रकरणांची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सरकार दरबारी करण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी दिली.
मुंबई महापालिकेत २००७-१० या तीन वर्षांच्या काळात मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा ठपका ‘कॅग’ने ठेवला असून २००७-१० या तीन वर्षांच्या काळात महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती. महापालिकेने अनेक कामे निविदा न मागविताच कंत्राटदारांना देऊन टाकली आहेत. तसेच अनेक कामांच्या कंत्राटांमध्ये फेरफारही केली आहे. या कामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचे, ‘कॅग’ने म्हटले आहे.
या काळात करण्यात आलेल्या कामे दुय्यम दर्जाची झाली असून त्यामुळे पालिकेचे नुकसान झाले आहे. स्थायी समिती आणि पालिका सभागृहात या संदर्भात झालेल्या चर्चेदरम्यान प्रकाशझोत टाकण्यात आला होता. मात्र आता ‘कॅग’नेच या कामांबाबत ठेपका टेवला आहे. त्यामुळे या गैरव्यवहारांवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे या प्रकरणांच्या सीआयडी चौकशीची मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे करणार असल्याचे निकम यांनी सांगितले.   

Story img Loader