खारघर येथील सिडकोच्या बहुचर्चित व्हॅली गोल्फ कोर्स आणि सायन-पनवेल मार्गावरील नवी मुंबईतील सर्वात मोठय़ा स्कायवॉकचे उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते रविवारी संध्याकाळी होत आहे. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित राहणार आहेत. शासनाच्या वतीने उभारण्यात येणारा हा राज्यातील पहिलाच गोल्फ कोर्स आहे.
उद्घाटनाच्या प्रतीक्षेत गेले अनेक महिने असलेल्या गोल्फ कोर्सला आता रविवारचा मुहूर्त लाभला असून, वन विभागाच्या कृपेमुळे हा गोल्फ कोर्स आंतरराष्ट्रीय ऐवजी राष्ट्रीय पातळीवरचा झाला आहे. वन विभागाने जवळची २२ हेक्टर जमीन देण्यास नकार दिल्याने हा कोर्स मोठा होऊ शकला नाही. यापूर्वी तो १८ होलचा प्रस्तावित होता तो आता ११ होलचा करण्यात आला आहे. त्यासाठी १०३ हेक्टर जमीन व्यापण्यात आली आहे.
या गोल्फ कोर्समध्ये गोल्फ प्रशिक्षण आणि क्लब हाऊसचा समावेश आहे. याशिवाय याच भागातील दीड किलोमीटर लांबीच्या स्कायवॉकचे उद्घाटनही पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ठाणे व रायगडचे पालकमंत्री गणेश नाईक, सुनील तटकरे, राज्यमंत्री भास्कर जाधव, स्थानिक खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत.

Story img Loader