सिडकोच्या वतीने खारघर सेक्टर ३६ येथे बांधण्यात येणाऱ्या एक हजार ३४४ घरांचा दर अखेर बुधवारी ठरविण्यात आला असून हा दर खासगी बिल्डरांच्या दराशी मिळताजुळता आहे. मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील या घरांची कमीत कमी किंमत ५१ लाख रुपये आहे, तर जास्तीत जास्त किंमत ९८ रुपये लाख आहे. सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या सिडकोनेही खासगी बिल्डरांचीच कास धरल्याचे या दरांवरून दिसून येते. आर्थिक मंदी असल्याने खारघरमध्ये सध्या विकासक याच दराने घरे विकत आहेत.
खारघर सेक्टर ३६ येथे पारसिक डोंगराच्या पायथ्याशी सिडकोने ३५ एकर जागेत एक हजार ३४४ घरांचा गृहसंकुल प्रकल्प राबविला आहे. बी. जी. शिर्के टेक्नॉलॉजी या पुण्यातील बांधकाम कंपनीला हे काम देण्यात आले असून ते ६० टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झालेले आहे. या ठिकाणी सध्या खासगी बिल्डर देत असलेल्या स्विमिंग पुलापासून ते जॉगिंग ट्रकपर्यंतच्या सर्व सुविधा प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या गृहप्रकल्पाकडे अनेकांचे लक्ष आहे. या घरांचे दर गेली आठ महिने ठरविण्याचे काम केले जात होते. बुधवारी नागपूर येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हे दर मंजूर करण्यात आले असून उच्च उत्पन्न गटातील घरांसाठी ६ हजार ४१० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. या प्रकारात ४२२ घरे असून एक हजार ५२२ चौरस फुटांचे हे घर कमीत कमी ९७ लाख ५६ हजार रुपयांना पडणार आहे. त्यानंतर पाचव्या मजल्यानंतर घेणाऱ्या ग्राहकाला ७५ रुपये प्रति चौरस फूट दर अधिक द्यावा लागणार आहे. त्यामुळे ही घरे एक कोटीपेक्षा जास्त किमतीची राहणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. दुसरी ८२२ घरे ही मध्यमवर्गीयांसाठी असून त्यांचा दर ५ हजार २५० रुपये प्रति चौरस फूट आहे. ही घरेही ५१ लाखांपासून सुरुवात होऊन त्यांच्या किमती ६० लाखांपर्यंत जाणार आहेत. त्यामुळे सिडकोसारख्या शासकीय कंपनीने बांधलेली घरेही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणारी असल्याचे दिसून येत आहे.
ही दोन्ही प्रकारांतील घरे घेण्यासाठी पाच ते दहा लाख रुपये केवळ अनामत रक्कम भरावी लागणार आहे. या संकुलात नवी मुंबई प्रकल्पग्रस्त, पत्रकार यांना पाच टक्क्यांचे आरक्षण देण्यात आले असून सिडको, शासकीय कर्मचाऱ्यांनाही पाच टक्क्यांचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. याशिवाय इतर सर्व घटकांना आरक्षण असून ५० टक्के आरक्षण हे खुले आहे.  डिसेंबपर्यंत या घरांच्या सोडती निघणार असल्याचे सिडकोच्या सूत्राने सांगितले.