नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा काही प्रभावी भाग कर्नाळा अभयारण्य मध्ये येत असल्याने केंद्रीय वन्यजीव विभागाची लागणारी आणखी एक महत्वाची परवानगी मिळविण्यात सिडकोला यश आले असून आता केवळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पॅकेज मान्य झाल्यास विमानतळाच्या कामाचा टेक ऑफ लवकरच होईल, असे चित्र दिसून येत आहे.
या विमानतळाच्या टेक ऑफ साठी केंद्राकडून मिळणाऱ्या अनेक परवानगीचे सोपस्कर पार पाडावे लागत आहेत. त्यात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दोन वर्षांपूर्वी हिरवा कंदील दाखविल्यानंतर याच मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या वन्यजीव विभागाची परवानगी महत्वाची मानली जात होती. नवी मुंबई विमानतळाच्या २० किलोमीटर क्षेत्रफळाच्या परिघातात कर्नाळा अभयारण्याचा काही भाग येत आहे. त्यामुळे या विभागाची परवानगी घेण्याची अट केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घातली होती.
त्यानुसार, केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाचे एक पथक सप्टेंबर २०१२ रोजी नवी मुंबईत आले होते. त्यांनी या अभयारण्यातील वन्यजीव प्राणी प्रभावित क्षेत्राची पाहणी केली. त्यानंतर भोपाळच्या या पथकाने केंद्रीय पर्यावरण विभागाला त्याचा अहवाल दिला. त्यानुसार वन्यजीव विभागाने सिडकोला हिरवा कंदील दिला. त्यामुळे या विमानतळ प्रकल्पातील चौथी महत्वाची परवानगी सिडकोला प्राप्त झाली आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्रीगट, केंद्रीय पर्यावरण, संरक्षण विभाग, यांच्या परवानगी सिडकोने मिळविल्या आहेत. यानंतर केवळ प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन व मुंबई उच्च न्यायालयाची खारफुटी स्थलांतर हे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत.