मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई विमानतळाशी मेट्रोने जोडणारा प्रकल्प आता खासगी विकासकाच्या सहभागातून राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. त्याचप्रमाणे याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) काढून ‘सिडको’कडे देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भविष्यातील रहदारीची मागणी पूर्ण करण्यासाठी ही दोन्ही विमानतळे मेट्रोने जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार या दोन विमानतळांना मुंबई मेट्रो मार्ग-८ ने जोडण्यात येणार असून, सुमारे ४० किलोमीटरचे हे अंतर मेट्रोमुळे सुमारे ३० मिनिटांत पार करता येणार आहे. या मार्गिकेचे मुंबईतील काम ‘एमएमआरडीए’ तर नवी मुंबईतील काम ‘सिडको’च्या माध्यमातून केले जाणार होते. प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी ‘एमएमआरडीए’वर सोपविण्यात आली होती. त्यानुसार प्राधिकरणाने प्रकल्पाचा आराखडा तयार करताना त्यावर १५ ते २० हजार कोटींचा खर्च अपेक्षित धरला होता.

‘एमएमआरडीए’ या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया राबविण्याच्या तयारीत असतानाच मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या मे २०२४ च्या बैठकीत या मार्गिकेचा बहुतांश भाग नवी मुंबईतून जात असल्याने ‘सिडको’नेच प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करावा असा निर्णय घेतला होता. तसेच या प्रकल्पाची अंमलबजावणी सार्वजनिक खाजगी भागिदारी तत्वावर (पीपीपी) म्हणजेच विकासकाच्या माध्यमातून राबविण्याचा निर्णय राज्सरकारने घेतला आहे.

अहवाल सादर करण्याचे आदेश

प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सिडकोमार्फत तयार करण्यास मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी ‘एमएमआरडीए’ने मुंबई मेट्रो मार्ग-८ प्रकल्पासंदर्भातील सुसाध्यता अहवाल व सविस्तर प्रकल्प अहवाल या संबंधीची प्राधिकरणाकडील माहिती व कागदपत्रे तत्काळ सिडकोकडे सुपूर्द करावीत असे आदेश देण्यात आले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cidco takes responsibility for mumbai navi mumbai airport metro report mumbai news amy