मुंबई : मध्य रेल्वेवरील डोंबिवली, खोपोली, जुचंद्र आणि इगतपुरी या रेल्वे स्थानकांमध्ये ‘प्री-फॅब्रिकेटेड सिनेडोम’ उभारण्यात येणार आहे. या स्थानकांमधील तब्बल पाच हजार चौरस फूट जागेत ‘सिनेडोम’ची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना या स्थानकांमध्ये माहितीपट, चित्रपट, लघुपट पाहता येतील.मध्या मध्य रेल्वेवरील स्थानकांचा पुनर्विकास सुरू आहे. त्यामुळे स्थानकामध्ये प्रवासीभिमुख सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच आता प्रवाशांच्या मनोरंजनासाठी रेल्वे स्थानकांमध्ये ‘सिनेडोम’ उभारण्यात येणार आहे. यातून मध्य रेल्वेला महसूल मिळणार आहे. यासाठी रेल्वे लवकरच ऑनलाइन निविदा प्रक्रियाही सुरू करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘प्री- फॅब्रिकेटेड सिनेडोम’ ही तात्पुरती व्यवस्था असून त्यासाठी कायमस्वरूपी बांधकाम करण्यास परवानगी देण्यात येणार नाही. ‘सिनेडोम’च्या व्यवस्थापन आणि प्रचालनाची जबाबदारी कंत्राटदारावरच सोपविण्यात येणार आहे. ‘प्री-फॅब्रिकेटेड सिनेडोम’ची उभारणी, संचालन, देखभाल आणि व्यवस्थापन ही जबाबदारी पूर्णत: परवानाधारकाची असेल आणि त्यासाठी येणारा खर्चही त्यालाच करावा लागणार आहे. गर्दीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी परवानाधारकाची असेल. १० वर्षांच्या कालावधीसाठी डोंबिवली, खोपोली, जुचंद्र आणि इगतपुरी स्थानकांवर ‘प्री-फॅब्रिकेटेड सिनेडोम’ उभारण्यात येणार आहे, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>गृहमंत्री अमित शाह यांनी सहकुटुंब ‘वर्षा’ निवासस्थानी घेतलं गणरायाचं दर्शन

मध्य रेल्वेला मिळणार लाखो रुपये महसूल

‘सिनेडोम’ची जबाबदारी सोपविण्यात येणाऱ्या संस्थेकडून मध्य रेल्वे शुल्कापोटी लाखो रुपये महसूल मिळणार आहे. ‘सिनेडोम’च्या माध्यमातून मध्य रेल्वेला प्रतिवर्षी डोंबिवली स्थानकातून ४७ लाख ८५ हजार ४०० रुपये, जुचंद्र स्थानकातून ३५ लाख ८२ हजार रुपये, इगतपुरी स्थानकातून १७ लाख १० हजार ४०० रुपये आणि खोपोली २३ लाख ३१ हजार १०० रुपये महसूल मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.