मुंबई : रवींद्र नाट्य मंदिर आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात यापुढे नाटकांच्या प्रयोगांबरोबरच चित्रपटही प्रदर्शित केले जाणार आहेत. ज्या थिएटरमध्ये नाटकाचे प्रयोग होतात तिथेच अत्याधुनिक पडदा लावून चित्रपटाचेही खेळ होणार आहेत. सिने-नाट्यगृह अशा स्वरुपाचे, अत्युच्च दर्जाची ध्वनियंत्रणा असलेले थिएटर या संकुलात तयार करण्यात आले आहे. नूतनीकरण केलेल्या या वास्तूमध्ये मराठी चित्रपटांसाठी ‘मॅटिनी शो’ राखीव ठेवण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलाच्या नूतनीकरण केलेल्या वास्तूचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. नूतनीकरण केलेल्या वास्तूमध्ये अनेक नवनवीन दालने, अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात आल्या आहेत. या संकुलाचे रुपडे पूर्णत: पालटले आहे. अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीत हे संकुल पुन्हा एकदा कलाकृती आणि कलाकारांनी गजबजणार आहे.

नूतनीकरण केलेल्या अकादमीमध्ये चित्रकला, शिल्पकला, नृत्य अशा विविध कलांसाठी पाच दालने आहेत. तसेच आतापर्यंत नाटकाचे प्रयोग होत असलेल्या या वास्तूत यापुढे रसिक प्रेक्षकांना नाटकाबरोबरच चित्रपटचाही आस्वाद घेता येणार आहे. मात्र काही दिवस नाटकासाठी, तर काही दिवस चित्रपटासाठी राखीव असतील. तसेच चित्रपटगृह न मिळणाऱ्या चित्रपटांसाठी, पुरस्कार प्राप्त चित्रपटांसाठी रोजचा ‘मॅटिनी शो’ निर्मात्यांकरीता मोफत असेल, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी दिले. तसेच रसिकांना त्याकरिता नाममात्र शुल्क आकारले जाईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच काही गाजलेले चित्रपट पुनप्रदर्शित केले जाणार आहेत. याच संकुलातील मिनी थिएटरमध्ये अत्युच्च दर्जाची ध्वनियंत्रणा उपलब्ध करण्यात आली असून विविध ध्वनिचित्रफिती पाहताना इथे आवाजांच्या विविध छटांचा आनंद घेता येणार आहे.

या वास्तूमध्ये पूर्वीप्रमाणे विविध कलांसाठी, नाटकांच्या तालमींसाठी दालने असतीलच, पण नव्या तंत्रज्ञानानुसार डबिंग, रेकॉर्डिंग या सुविधाही उपलब्ध होणार आहेत. तसेच येत्या काळात विविध कलाकृतींशी संबंधित २० नवीन अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती खारगे यांनी दिली. पु. ल. देशपांडे कला अकादमीचा वारसा आणि अत्याधुनिकतेचा संगम या वास्तूत केला असल्याची माहिती खरगे यांनी दिली. तसेच या वास्तूच्या मागच्या प्रांगणात ‘पु. ल. कट्टा’ या नावाने एक ॲम्फि थिएटर तयार करण्यात आले असून इथे मुक्त प्रांगणावरही कार्यक्रम सादर करता येणार आहेत. पु. ल. देशपांडे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच ही वास्तू तयार करण्यात आली आहे.

( वास्तूच्या आवारात पु. ल. देशपांडे यांचा पुतळा असून प्रवेशद्वाराजवळ नाटकाच्या घंटेची प्रतिकृतीही ठेवण्यात आली आहे. तसेच नाटकाच्या मुहूर्ताच्या वेळी वाढवलेल्या नारळाची प्रतिकृतीही ठेवण्यात आली आहे. तर वास्तूच्या आतील भागात रवींद्रनाथ टागोरांचे शिल्प साकारण्यात आले आहे.)