महापालिका सभागृहाला अंधारात ठेवून प्रशासनाने व्यावसायिक जाहिरातींच्या होर्डिगबाबतच्या धोरणात परस्पर केलेल्या बदलांना स्थायी समितीच्या बैठकीत विरोध करण्यात आला. या संदर्भात प्रशासनाने जारी केलेले परिपत्रक त्वरित स्थगित करावे, असे आदेश स्थायी समिती अध्यक्षांनी यावेळी दिले.
व्यावसायिक होर्डिगबाबत काही वर्षांपूर्वी पालिका सभागृहाने १० वर्षांसाठी धोरण मंजूर केले होते. मात्र १० वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच या धोरणात फेरफार करणारे परिपत्रक पालिका प्रशासनाने अलीकडेच जारी केले.
या परिपत्रकानुसार मुंबईतील ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींवर जाहिरातींचे होर्डिग झळकविण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच दोन जाहिरातींमध्ये १०० मीटर अंतराची सक्ती करण्यात आली आहे.
पालिका सभागृहाला अंधारात ठेवून धोरणामध्ये परस्पर फेरबदल करीत प्रशासनाने नगरसेवकांचा अवमान केला आहे. त्यामुळे या परिपत्रकाला त्वरित स्थगिती द्यावी, अशी मागणी सभागृह नेते यशोधर फणसे यांनी केली.
प्रशासनाने आपल्या परिपत्रकातून मुंबईमधील ‘स्ट्रीट फर्निचर’ला (रस्त्यांवरील दुभाजक) वगळले आहे. स्ट्रीट फर्निचरची कामे करणाऱ्या कंपन्यांच्या हितासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे, असा आरोप करून स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी या परिपत्रकाला स्थगिती देण्याचे आदेश दिले.