स्वातंत्र्योत्तर भारतात आधुनिक स्थापत्यरचनेचा पाया चार्ल्स कोरिया यांनी रचला. शहरी गरिबांच्या गरजा आणि वास्तुरचनेत पारंपरिक पद्धती आणि साहित्याचा वापर करण्याला त्यांनी महत्त्व दिले. काचेच्या इमारती बांधण्यास मात्र त्यांचा विरोध होता. २१व्या शतकातील शहर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या नवी मुंबईची निर्मितीही चार्ल्स यांनीच केली. भारतातील अनेक महत्त्वाच्या वास्तू त्यांच्या परिसस्पर्शाने वैशिष्टय़पूर्ण बनल्या होत्या. मुंबईचे सिंगापूर किंवा शांघाय करण्याची कल्पना योग्य नाही, कारण त्यांचे आणि आपले प्रश्न वेगळे आहेत, असे कोरिया यांचे स्पष्ट मत होते. आज ज्या इमारती दिसतात त्याला वास्तुरचना म्हणता येणार नाही तर बांधकामे म्हणता येईल. आजच्या काळात वास्तू नियोजकाची जागा बिल्डर आणि राजकारणी यांनी घेतली आहे, असे चार्ल्स कोरिया यांचे मत होते.

रचना केलेल्या वास्तू
गुजरातेतील गांधी स्मारक, मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचे ब्रेन सायन्स सेंटर, कॅनडातील टोरांटोचे इस्माइली सेंटर व न्यूयॉर्क येथे भारताच्या स्थायी दूतावासाचा समावेश होता. नवी मुंबई उपनगर, अनेक शैक्षणिक संस्था, सरकारी इमारती, कमी उत्पन्न गटातील घरे, मध्य प्रदेशचे विधानभवन, भोपाळचे भारत भवन, दिल्लीचे क्राफ्ट्स म्युझियम, ब्रिटिश कौन्सिल इमारत, साबरमती आश्रम, जवाहर कलाकेंद्र, जयपूर, सिटी सेंटर कोलकाता, सिटी डे हॉटेल्स (गोवा व कोवलम)

मुंबईचे प्रश्न मुंबईमध्येच सुटणार नाहीत. त्यासाठी समांतर शहराची गरज असल्याचे कोरिया यांनी सांगितले होते. अशा शहराची रचना कशी असेल याचा पूर्ण अभ्यास करून त्यांनी एका लेखात त्याचे मॉडेलही मांडले होते. शहरांचा सम्यक दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी ‘अर्बन कमिशन’ समिती स्थापन केली होती. एक वास्तुरचनाकार म्हणून त्यांचे काम महत्त्वाचे होते.
सुलक्षणा महाजन, वास्तू व नगर रचनाकार

कोरिया यांना भारतीय मातीची जाण होती. ती त्यांच्या रचनांमधूनही दिसून येते. त्यांची वक्तृत्वशैली उत्तम होती आणि त्यांचा अभ्यासही दांडगा होता. त्यांच्या माहितीला चित्रांची जोड असायची. त्यामुळे समोरच्याला विषयाबद्दल समजून घेणे सोपे  जायचे. मुंबईवर त्यांचे खास प्रेम होते.  
– प्रकाश पेठे, वास्तुरचनाकार

कोरिया उत्तम वास्तुरचनाकार होतेच, पण ते माणूस म्हणूनही उत्तम होते. त्यांच्यात जातीवंत कलाकार दडलेला होता. त्यांची एक रचना दुसऱ्याप्रमाणे दिसणार नाही, याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले.
शरद तरडे, शिल्पकार आणि चित्रकार

पुरस्कार व मानसन्मान
* पहिल्या राष्ट्रीय शहरीकरण आयोगाचे अध्यक्ष
* इंटरनॅशनल युनियन ऑफ आर्किटेक्चरचे सुवर्णपदक
* आगाखान पुरस्कार
* पद्मश्री व पद्मविभूषण
* रॉयल गोल्ड मेडल ’गोमंतक भूषण
लेखन- ‘अ प्लेस इन शेड’ वास्तुशास्त्रावरील पुस्तक

Story img Loader