मुंबई : कपड्यांमध्ये लवपून सोन्याची तस्करी करणाऱ्या बिहारमधील नागरिकाला सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरूवारी अटक केली. या व्यक्तीने विशिष्ट पद्धतीने शिवलेल्या कपड्यांमध्ये सोने लपवले होते. या व्यक्तीकडून चार किलो २६५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंंमत सव्वादोन कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा >>> मुंबई : १० कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी; नऊ परदेशी महिलांना अखेर जामीन

याप्रकरणी सीमाशुल्क विभागातील अधिकारी अधिक तपास करीत आहेत. जमिउल्ला अहमद (३९) असे अटक आरोपीचे नाव असून तो बिहारमधील सिवान येथील रहिवासी आहे. आरोपी बुधवारी रात्री विमानाने दुबई येथून आला होता. संशयावरून सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला विमानतळावर थांबवले. त्याची झडती घेतली असता त्याने परिधान केलेली जीन्स, अंतर्वस्त्र, पायात घातलेली पट्टीमध्ये सोने लपवल्याचे निष्पन्न झाले. तसेच कसून तपासणी केली असता कपड्यात दडवलेल्या छोट्या पाकिटांमध्ये भुकटी स्वरूपात सोने असल्याचे उघडकीस आले.

हेही वाचा >>> मुंबई : धोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा खंडित करणार

आरोपीकडून एकूण चार किलो २६५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. या सोन्याची किंमत दोन कोटी २८ लाख ९६ हजार रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. याप्रकरणी सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून गुरूवारी पहाटे आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीने यापूर्वीही अशाप्रकारे सोन्याची तस्करी केली होती का? याबाबत सीमाशुल्क विभागातील अधिकारी अधिक तपास करीत आहेत. 

Story img Loader