मुंबई : मुंबई आणि उपनगरांच्या वेगवेगळ्या भागांत गुरुवारी अतिमुसळधार पावसाची नोंद झाली असली, तरी पावसाने हवामान विभागाचे अंदाज वारंवार चुकविले. गुरुवारी सकाळी मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज असताना मुंबईकरांना ‘कोसळधारां’चा अनुभव आला. त्यानंतर शुक्रवारी सकाळपर्यंत अतिवृष्टीचा ‘सुधारित’ अंदाज जाहीर होताच पावसाचा जोर ओसरला. हवामान विभागाच्या या फसलेल्या इशाऱ्यांमुळे नागरिक आणि यंत्रणांची पुन्हा एकदा फसगत केली.

मुंबईत जून महिन्यात मोसमी पाऊस दाखल झाल्यापासून हवामान विभागाने मुंबई संदर्भात दिलेले पावसाचे बहुतांश अंदाज व इशारे हे प्रत्यक्ष परिस्थितीशी विसंगत ठरले. मुंबईत बुधवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. प्रत्यक्षात दिवसभरात कुलाबा येथे केवळ २.५ मिमी तर सांताक्रूझ येथे ६.९ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर गुरुवारी मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याचे भाकीत करण्यात आले. प्रत्यक्षात पहाटेपासून मुंबई शहर आणि उपनगरांत अतिमुसळधार पाऊस झाला. या पावसाने मुंबईची पुरती ‘तुंबई’ झाल्यानंतर हवामान विभागाने दुपारी १ च्या सुमारास मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांसाठी शुक्रवारी सकाळी ८.३० पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला. मात्र हा इशारा दिल्यानंतर लागलीच पावसाचा जोर ओसरल्याचा अनुभव आला.

हेही वाचा >>>मुंबई: पावसामुळे १५० हून अधिक लोकल रद्द

शाळांची तारांबळ

हवामान विभागाने गुरुवारसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला नसल्यामुळे सकाळच्या सत्रात शाळा भरवण्यात आल्या. मात्र मुसळधार पाऊस झाल्यानंतर अंदाज बदलण्यात आला व विद्यार्थ्यांना घरी पाठवण्याची सूचना देण्यात आली. दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर झाली. प्रत्यक्षात दुपारनंतर पाऊस कायम असला तरी त्याचा जोर मात्र ओसरला होता.